गांधी चौकात आज धरणे : उद्या शेतकरी संघटना करणार सीमा सीललोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मनातही असंतोष खदखदत आहे. पश्चिम महाराष्ट्रात पेटलेला शेतकऱ्यांचा संप विदर्भाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. नागपूर, अमरावती, वर्धा, यवतमाळ आदी जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही आंदोलनाची धग पोहोचत आहे. शनिवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात गांधी चौकात धरणे देण्यात येणार आहेत. तर रविवारी शेतकरी संघटनेने महाराष्ट्र-तेलंगणा सीमा सील करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कर्जमुक्तीसह शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव, विजेचा पुरेसा पुरवठा, सिंचनाच्या सुविधा आदी विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांच्या समन्वय समितीने १ ते ७ जून या कालावधीत संप पुरकारला. शेतकऱ्यांनी प्रथमच संपाचे हत्यार उपसले आहे. त्याला उत्स्फूत प्रतिसाद मिळत आहेत. शेतकऱ्यांचा संप पहिल्या दिवसापासूनच हिंसक झाला आहे. मुंबई शहराला होणारा दूध व पालेभाज्याचा पुरवठा रोखण्यात आला आहे. आंदोलनाची तीव्रता सर्वाधिक अहमदनगर जिल्ह्यात आहे. त्यामुळे शेतकरी नेत्यांसह सर्वसामान्य शेतकऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येत आहे. त्याची पर्वा न करता चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आंदोलनाची घोषणा केली आहे. चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आलेल्या शेतकऱ्यांनी ‘लोकमत’कडे सरकारविरोधात राग व्यक्त केला. बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची शेकडो क्विंटल तूर पडलेली आहे. नाफेडच्या ग्रेडरनी तूर गाळणी वारंवार केल्याने तूर खरेदीची गती मंद होती. परिणामी ३१ जूनपर्यंत तुरीची पूर्ण खरेदी होऊ शकलेली नाही. शेतकऱ्यांना टोकन देऊन परत पाठविण्यात आले आहे. तुरीचे पोते बाजार समितीत पडून आहेत. टोकन दिलेल्या तुरीबाबत सरकारने अद्याप भूमिका घेतलेली नाही. एकीकडे मुुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांकडील तुरीचा शेवटचा दाणा खरेदी करण्याची घोषणा केली आहेत. दुसरीकडे चंद्रपूर बाजार समितीत आठ दिवसांपूर्वी तूर आणल्यानंतरही त्या पोत्यांचे वजन झालेले नाही. त्याला शेतकरी वैतागले आहेत. त्यांनी सरकारच्या भूमिकेविरोधात जळजळीत प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.तेलंगणा-मध्य प्रदेशातील पालेभाज्यांची आवकचंद्रपूरमध्ये पालेभाज्यांचा पुरवठा शेजारच्या तेलंगणा व मध्य प्रदेशातून होत असतो. त्यामुळे सध्या पालेभाज्यांची आवक नेहमीप्रमाणे कायम आहे. चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी सकाळी तेलंगणामधील पालेभाज्यांचे ट्रक व मिनी ट्रक आले होते. शेतकरी शेती मशागतीच्या कामात गुंतला असल्याने पालेभाज्यांचे भाव कडाडले आहेत. वांगी, भेेंडी, फ्लॉवर, कोबी आदी भाज्यांच्या भावामध्ये दीडपट वाढ झाली आहे. एकीकडे शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधात असंतोष निर्माण होत असताना सर्वसामान्य ग्राहकांना महागड्या पालेभाज्या खरेदी कराव्या लागत आहेत.तेलंगणातील शेतकऱ्यांना सहकार्याचे आवाहनशेतकरी संघटनेचे नेते अॅड. वामनराव चटप यांनी तेलंगणातून येणारे दूध आणि पालेभाज्या महाराष्ट्र-तेलंगणाच्या सीमेवरील लक्कडकोट येथे रविवारी रोखण्याची घोषणा केली. तसेच त्यांनी तेलंगणामधील शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील संपाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. तेलंगणाच्या सीमेवर पडणारी ठिणगी पुढे वणव्याचे रूप धारण करेल, असा इशाराही अॅड. चटप यांनी दिला. आज विविध किसान संघटनांचे धरणेशेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी विदर्भ किसान मजदूर काँग्रेसतर्फे चंद्रपूर येथील गांधी चौकात धरणे देण्यात येणार आहे. या आंदोलनाला शहर काँग्रेसचे अध्यक्ष नंदू नागरकर यांनी पाठिंबा दिला आहे. तसेच या धरणे आंदोलनाला शेतकरी संघटना व राष्ट्रवादी किसान सभेने पाठिंबा दिला आहे.
जिल्ह्यात पोहोचली शेतकरी संपाची धग
By admin | Updated: June 3, 2017 00:29 IST