पत्रपरिषदेत आरोप : मालकीच्या जागेत अतिक्रमण करण्याचा अट्टाहासभद्रावती : भूमिअभिलेख कार्यालयाकडून जागेची मागणी करून माझी जागा आपल्या कब्जात घेतल्यानंतरही चंदनखेडा येथील सरपंचाच्या पतीने मनमानी आणि गुंडगिरी पद्धतीने वागून मी तयार केलेल्या तारेचे कम्पाऊंड पोलसह काढून नेले. याविरोधात तू कुठेही जा, खासदार माझ्या पाठीशी आहे, असा त्यांनी दम दिल्याचा आरोप जितेंद्र नामदेवराव धकाते व इतरांनी तालुक्यातील चंदनखेडा येथे घेण्यात आलेल्या पत्रपरिषदेत केला.चंदनखेडा हे गाव केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर ‘सांसद आदर्श ग्राम’ म्हणून दत्तक घेतले आहे. एकीकडे ना. अहीर यांचे हे गाव आदर्श व्हावे, यासाठी प्रयत्न सुरु असताना त्याचेच नाव घेऊन सरपंचाचे पती डेव्हीड बागेसर हे गुंडगिरी प्रवृत्तीनुसार वागणुकीने गावकऱ्यात दहशत निर्माण करीत असल्याने ना. अहीर यांचा सांसद आदर्श ग्राम संकल्पनेला तडा देत असल्याचा आरोपही जितेंद्र धकाते यांनी केला. जितेंद्र धकाते यांची वडिलोपार्जित जमीन प्राथमिक आरोग्य केंद्राला व आठवडी बाजाराला लागून सर्व्हे नं. २९/१ मध्ये ०.८१ आर एवढी होती. त्यापैकी ०.५५ हे.आर. जागा प्राथमिक आरोग्य केंद्राला विकली. उर्वरित ०.२६ हे.आर. जागा भूमिअभिलेख कार्यालयामार्फत मोजून हद्द कायम करण्यात आला. सरपंच गायत्री बागेसर यांचा पती डेव्हिड बागेसर यांनी ‘सांसद आदर्श ग्राम’ अंतर्गत आठवडी बाजाराच्या विस्तारी करणाकरिता मंजूर झालेल्या निधीच्या माध्यमातून आठवडी बाजाराच्या ओट्याचे बांधकाम सुरू केले. यातील काही ओटे हे आमच्या जागेत येत असल्याने सरपंच गायत्री बागेसर यांना लिखित स्वरूपात तक्रार केली. परंतू त्यांचे पती डेव्हीड यांनी आपल्या गुंडगिरी प्रवृत्तीचा आणि खासदारांच्या नावांचा आधार घेत बांधकाम सुरूच ठेवले. १६ जूनला जागेच्या मोक्यावर लावलेले कुंपण तोडून तार व पोलसह सरपंच पती बागेसर घेवून जात असताना हस्तक्षेप केला असता आम्हालाच अश्लील शब्दात शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. आम्ही न्यायपूर्ण मार्गाने जात असताना आमच्याच मालकीचे जागेवर जबरदस्ती करणाऱ्या डेव्हीड बागेसर याचेवर कारवाई करून आम्हाला न्याय देण्यात यावा, अशी मागणी जितेंद्र धकाते व त्यांच्या कुटुंबीयांनी पत्रपरिषदेत केला. न्याय न मिळाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुधीर मुडेवार, ग्रामपंचायत सदस्य सदानंद आगबत्तनवार हे उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
खासदाराच्या नावाचा उपयोग करून सरपंच पतीची गुंडगिरी
By admin | Updated: June 21, 2016 00:46 IST