चंद्रपूर : सध्या चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये घनकचरा संकलनाच्या निविदेवरून चांगलेच प्रकरण तापत आहे. मंगळवारी नगरसेवक सुनिता लोढिया, नंदू नागरकर यांनी निविदा प्रकरणामध्ये भ्रष्टाचाराचा आरोप केल्यानंतर बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक संजय वैद्य यांनी सावध भूमिका घेत या प्रकरणामध्ये महानगरपालिकेची नाहक बदनामी होत असल्याचे पत्रकार परिषदेत म्हटले आहे. महानगरपालिकेने घनकचरा संकलनाचे कंत्राट नागपूर येथील सेंट्रल फॉर डेव्हलपमेंट कम्युनिकेशन या कंपनीला दिले आहे. यासाठी मनपाला प्रतिमहिना ५४ लाख रुपये मोजावे लागणार आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीच त्याच कंपनीला कचरा गोळा करण्याचे कंत्राट दिले असताना केवळ २० लाख रुपयांत सदर कंत्राट देण्यात आले होते. ते कंत्राट रद्द करून नव्याने निविदा काढण्यात आल्या. कंत्राट देताना मोठा घोळ झाल्याचा आरोप नगरसेवक सुनिता लोढिया, नंदू नागरकर यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. त्यानंतर बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक संजय वैद्य, नगरसेवक बलराम डोडानी यांनी पत्रकार परिषद घेऊन कचरा कंत्राटप्रकरणात महानगरपालिकेची नाहक बदनामी होत आहे. सामान्य नागरिक आपल्याला महानगरपालिकेत मोठा भ्रष्टाचार झाला असताना गप्प का, असे प्रश्न विचारत असून यामुळे आपल्याला नागरिकांच्या प्रश्नांचे उत्तर द्यावे लागत असल्याचे ते म्हणाले. विशेष म्हणजे, न्यायालयाच्या निर्देशानुसार जानेवारी १५ पर्यंत शहरातील कचरा संकलन करणाऱ्यांना घरोघरी पाठविणे आहे. त्यानुसार महानगरपालिकेने कचरा संकलन करण्यासाठी निविदा मागितल्या. प्रथम केवळ एकच निविदा आली. त्यानंतर दोन निविदा आहे. ज्यांचा दर कमी होता. त्यांना कंत्राट देण्यात आले. यामध्ये घोळ होण्याची शक्यता त्यांनी फेटाळली. (नगर प्रतिनिधी)
मनपातील घनकचऱ्याच्या वादात संजय वैद्य यांची उडी
By admin | Updated: February 26, 2015 00:44 IST