चंद्रपूर : ग्रामीण क्षेत्राच्या विकासाकरिता सातत्याने संघर्ष करून ग्रामीण क्षेत्रात रस्ते, पेयजल व अन्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केला आहे. खासदार स्थानिक विकास निधी, वेकोलि सीएसआर फंड, उद्योगांद्वारा विकासाकरिता निर्गमित होणारा सीएसआर फंड खनिज विकास निधी व अन्य माध्यमातून खेड्यांचा विकास साधण्यात येणार आहे. राजुरा, भद्रावती, चंद्रपूर या तालुक्यांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित झालेल्या रस्त्यांच्या दुरूस्तीकरिता ७ कोटी ३ लाख रुपयांचा निधी खनिज विकास निधीच्या माध्यमातून उपलब्ध झाला आहे. या कामास प्रशासकीय व वित्तीय मान्यतासुद्धा मिळाली आहे.केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या प्रयत्नातून ग्रामीण क्षेत्रातील अनेक रस्त्यांचे बांधकाम नजिकच्या कालावधीत पुर्णत्वास जाणार आहे. भद्रावती तालुक्यात खनिज विकास निधी अंतर्गत जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या माध्यमातून १ कोटी ११ लाख रुपये खर्चाचे चंदनखेडा ते खोकरी या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण होत आहे. चरूर (घा.) ते आगरा या रस्त्याच्या मजबुती व डांबरीकरणाकरिता ५६ लाख १२ हजार, पारोधी ते चंदनखेडा रस्त्याचे नूतनीकरण व डांबरीकरणासाठी १९ लाख २९ हजार, चंदनखेडा येथील एसटी बसस्टॅन्ड ते प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे बांधकामासाठी २० लाख १७ हजार, एसटी बसस्टॅन्ड आगरा बोरगांव (धांडे) येथे रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरणाकरिता २३ लाख ५१ हजार रुपये मंजूर झाले आहे.राजुरा तालुक्यात याच निधी अंतर्गत साखरी, निर्ली, धिडसी रस्त्याच्या मजबुती व डांबरीकरणाकरिता ७६ लाख ७५ हजार, पेल्लोरा ते धिडसी या रस्त्याचे मजबुती व डांबरीकरणाकरिता ६२ लाख ८२ हजार, धिडसी ते निर्ली रस्त्याकरिता ५० लाख ६३ हजार, राजुरा-माथरा-गोवरी-पवनी - कवठाळा रस्त्याकरिता ८४ लाख ५४ हजार, मार्डा-कुर्ली पोचमार्गाच्या मजबुती व डांबरीकरणाकरिता ५५ लाख १९ हजार, राजुरा-सास्ती (रामनगर), कोलगाव-कडोली-चार्ली रस्त्याकरिता ४९ लाख ३६ हजार, निर्ली-चार्ली रस्त्याचे मजबुतीकरण, डांबरीकरणासाठी ४९ लाख ४९ हजार तर चंद्रपूर महानगरातील रामनगर ते एमआयडीसी रस्त्याला जोडणारे महर्षी विद्यामंदिर पोचमार्गाच्या सिमेंट काँक्रीटीकरण रस्त्याच्या बांधकामाकरिता ४३ लाख ६७ हजार रुपये अशा एकुण ७ कोटी ३ लाख रुपयांचा खनिज विकास निधी मंजूर झाला आहे. ग्रामीण क्षेत्रातील रस्त्याच्या बांधकामाकरिता प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना यामुळे न्याय मिळणार आहे. (शहर प्रतिनिधी)
ग्रामीण रस्त्यांची दुरूस्ती होणार
By admin | Updated: April 5, 2016 03:35 IST