राजुरा : तालुक्यात तात्काळ वैद्यकीय सेवा १०८ या टोल फ्री क्रमांकावर सुरू झाली आहे. राजुरा विधानसभा मतदार संघातील,राजुरा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती या दुर्गम तालुक्यामध्ये अत्याधुनिक सुविधांसह सात रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. या सेवेचा नागरिकांनी पुरेपुर लाभ घ्यावा, असे मत राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी व्यक्त केले आहे.जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्याला टोल फ्री क्रमांकाची रूग्णवाहिका उपलब्ध झाली आहे. राजुरा, कोरपना हे औद्योगिक तालुके आहेत. आदिवासी बहुल भागातील बांधवांना आरोग्य सेवा वेळेवर उपलब्ध होत नाही. मात्र शासनाच्या या नविन योजनेमुळे दुर्गम भागातील नागरिकांना तात्काळ आरोग्य सेवा मिळणार आहे. गंभीर रुग्णांसाठी या योजनेमुळे नवसंजिवनी मिळणार आहे. तालुक्यामध्ये अपघाताचे प्रमाण अधिक असुन वेळोवेळी अपघात टाळणे व रुग्णांना तातडीने सेवा उपलब्ध करून देणे यापुर्वी शक्य नव्हते. त्यामुळे अनेकांना सेवेअभावी आपला जीव गमवावा लागत होता. इमरजन्सी मेडीकल सर्व्हिसही सेवा सुरू झाल्याने अनेकांचा याचा लाभ घेता येणार आहे. ग्रामीण रुग्णालय राजुरा येथे २, गडचांदूर १, कोरपना १, गोंडपिपरी १, जिवती १, प्राथमिक आरोग्य केंद्र देवाडा १ अशाप्रकारे राजुरा विधानसभा क्षेत्रात एकुण ७ रुग्णवाहिका अत्याधुनिक सुविधांसह दाखल आहेत.यामध्ये दोेन डॉक्टर नेहमीसाठी उपलब्ध असुन आॅक्सीजन, सीपीआर, मशीन व्हेंटीलेटर व इतर अत्याधुनिक आकस्मिक उपचार साहित्य उपलब्ध आहे. रुग्णांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क न घेता मोफत सेवा पुरविण्यासाठी हाकेला साथ देणारी, तत्परतेने सेवा पुरविणारी नि:शुल्क आरोग्य सेवा उपलब्ध आहे.अपघाताच्या किंवा तातडीच्या पहिल्या तासात आरोग्य सेवा उपलब्ध होत नसल्याने अनेकांचा मृत्यू होतो. मात्र १०८ टोल फ्री क्रमांकाची रुग्णवाहिका दाखल झाल्याने जिविताचा धोका टळणार आहे. सदर रुग्णवाहिकामुळे एका दुतासारखे काम होत आहे. तातडीच्या प्रसंगी १०८ या टोल फ्री क्रमांकावर फोन करून सर्व जनतेनी सदर योजनेचा पुरेपुर लाभ घेण्याची विनंती आमदार सुभाष धोटे यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
ग्रामीण भागातील नागरिकांनी आरोग्य सुविधांचा लाभ घ्यावा
By admin | Updated: July 27, 2014 23:39 IST