पोळ्यातील झडत्यांतून ग्रामीण लोकसंस्कृतीचे प्रतिबिंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 12:35 AM2019-08-29T00:35:33+5:302019-08-29T00:36:14+5:30

‘आज अवतन घ्या अन उद्या जेवायला या’ अशा प्रकारचे आमंत्रण पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना दिल्या जाते. पोळा हा शेतकऱ्यांसाठी सुखकर सण आहे. याचदिवशी मातीची बैलजोडी, गाय वासरू वगैरे घडवून त्यांची पूजा केली जाते.

rural Festival Pola culture through the bark | पोळ्यातील झडत्यांतून ग्रामीण लोकसंस्कृतीचे प्रतिबिंब

पोळ्यातील झडत्यांतून ग्रामीण लोकसंस्कृतीचे प्रतिबिंब

googlenewsNext

लोकमत विशेष
पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलाचे खांदे शेकणीचा कार्यक्रम असतो. शेतकरी तूप किंवा तेल आणि हळद लावून बैलाचे खांदे शेकतात. ‘आज अवतन घ्या अन उद्या जेवायला या’ अशा प्रकारचे आमंत्रण पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना दिल्या जाते. पोळा हा शेतकऱ्यांसाठी सुखकर सण आहे. याचदिवशी मातीची बैलजोडी, गाय वासरू वगैरे घडवून त्यांची पूजा केली जाते. दुसºया दिवशी बैलजोडीला सजवून रंगवून पोळ्यात आणली जाते. सूर्यास्ताच्या वेळी गावाबाहेरील मोकळ्या जागेवर तोरणाखाली बैलांना उभे केल्यावर गावातील प्रतिष्ठित व्यक्तीची बैलजोडी जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत खेडयातील पोळा फुटत नाही. ढोल-ताशांच्या गजरात शेतकऱ्यांनी सीमेवर बैल आणले की पोळ्यामध्ये वाजतगाजत झडत्यांचा कार्यक्रम सुरू होतो. ग्रामीण भागातील शेतकºयांची स्थिती झडत्यांच्या माध्यमातून दिसते. एक दुसºयांवर शह काटशह देत गावकरी झडतीचा आनंद लुटतात. बैल पोळ्यांच्या दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा भरवला जातो. या दिवशी लहान बच्चे कंपनी लाकडाचे नंदीबैल सजवून तान्ह्या पोळ्यात आणतात. आणि पोळ्याचा आनंद लुटतात. अलिकडे वाढत्या शहरीकरणामुळे पारंपारिक बैल पोळ्याचे स्वरूप बदलत चालले असले तरी ग्रामीण भागातील पोळ्याची लोकसंस्कृती अजूनही पोळ्यातील झडत्यांच्या माध्यमातून जीवंत दिसते.
‘पोया रे पोया, बैलाचा पोया
तुरीच्या दायीन, मारला हो डोया
कांद्याने आमचे केले हो वांदे
उसावाला बाप ढसाढसा रडे
एक नमन कवडा पार्वती
हर बोला हरहर महादेव’
अशा प्रकारचे आधुनिक संदर्भ अलिकडे झडत्यांतून दिसतात. तर प्रतिकूल परिस्थितीत शेतकºयांना एकत्रित होऊन शेतकरी हित साधले पाहिजे, असा पोटतिडकीने सल्लाही दिला जातो.
पोळा रे पोळा
पाऊस झाला भोळा
शेतकरी हितासाठी
सगळे व्हा गोळा
तर अशाही प्रकारच्या पारंपारिक झडत्या ऐकायला मिळतात. साक्षर निरक्षर असा भेद न करता शेतकरी झडत्या म्हणून पोळ्याचा आनंद द्विगुणित करीत असतात.
चकचाडा बैलबाडा
बैल गेला हो पहुनगडा
पहुनगडयाची आणली माती
गुरू न घडविला हो नंदी
ते नेला हो पोळ्यामंदी
एक नमन गौरा पार्वती
हर बोला हरहर महादेव
काही झडत्यांमध्ये वर्तमानातील दुष्काळ वगैरे संदर्भ आल्याने त्या झडत्या काळाशी अनुरूप वाटतात.
माह्या पायाला रूतला काटा
झालो मी रिकामा
नाही पिकल यंदा
तर जीव मह्या टांगणीला
एक नमन गौरा पार्वती
हर बोला हरहर महादेव
याच प्रकारची आणखी एक झडती शेतकºयांच्या मनाचा ठाव घेणारी आहे. अशा विविध प्रकारातून शेती आणि शेतकरी यांच्या भावविश्वावर प्रकाश टाकला जातो.
आम्ही करतो पºहाटीची शेती
पºहाटीवर पडली बोंड अळी
नागोबुडा म्हणते बुडाली शेती
पोरगा म्हणते लाव मातीले छाती
एक नमन गौरा पार्वती
हर बोला हरहर महादेव
काही झडत्यांमध्ये पौराणिक संदर्भ येतात. त्यातून शेतकºयांच्या जीवनातील दैन्य दृष्टीक्षेपात येते.
वाटी रे वाटी खोबºयाची वाटी
महादेव रडे दोन पैशासाठी
पार्वतीच्या लुगडयाले छप्पन गाठी
देव कवा धावल गरीबासाठी
एक नमन गौरा पार्वती
हर बोला हरहर महादेव
काही झडत्यांतून सामाजिक संदर्भाचा उल्लेख कळत नकळत येत असतो. जसे-
आभाळ गडगडे शिंग फडफडे
शिंगात पडले खडे
तुही माय काढे तेलातले वडे
तुया बाप खाये पेढे
एक नमन गौरा पार्वती
हर बोला हरहर महादेव
गावकरी एकमेकांना शह प्रतिशह देण्यासाठी झडत्या म्हणत असतात. तेव्हा पुढीलप्रमाणे झडती ऐकायला मिळते.
मेंढी रे मेंढी शेंबडी मेंढी
ते खाते आता वल्ला पाला
तिचा गुरू मह्या चेला
लाथ मारून सरका केला
अशा शेतकऱ्याच्या दैनंदिन जगण्यातील संदर्भ आल्याने झडत्यातील लोकसंस्कृती प्रतिबिंबित होऊन ऐकणाºयांचे मनोरंजन होत असते.

Web Title: rural Festival Pola culture through the bark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.