कोरोनाच्या संक्रमणाची साखळी तोडण्याकरिता कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. एकीकडे कोरोनाच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ होत असताना, दुसरीकडे मात्र रेती तस्कर कोरोनावर भारी पडल्याचे चित्र नजरेस पडत आहे. सध्या तालुक्यातील रेती घाट तस्करांसाठी वरदान ठरत आहे. गोंडपिपरी तालुक्यातील हिवरा, तारसा, लिखितवाडा, येनबोडला, घाटकूर, धाबा आदी घाटांचे लिलाव झाले नसल्याने अनेक रेती तस्करांनी या घाटावर धुडगूस घातला आहे. या घाटातील रेती बारीक व चांगल्या दर्जाची असल्याने मागणी वाढली आहे. त्यामुळे शहरातील रेती तस्कर सैराट झाले आहे. काही हायवातून रेतीची ओव्हरलोड चोरटी वाहतूक होत असल्याचे दिसून येत आहे. सध्या प्रति हायवा ३० ते ३५ हजार रुपये मोजावे लागत असल्याने या फुकटच्या रेतीवर काही तस्कर चांगलेच मालामाल झाले आहेत. विशेष म्हणजे गोंडपिपरी तालुक्यातून खुलेआम रेतीची तस्करी होत असतानासुध्दा हा प्रकार अधिकाऱ्यांना दिसत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ४० ते ४५ किमीच्या अंतरावरून चोरटी वाहतूक होत असूनदेखील पोलीस व महसूल विभागाने डोळ्यावर पट्टी बांधल्याने तस्करांचे चांगलेच फावत आहे. राजुरा तालुक्यातील विहिरगाव, विरुर स्टेशन या भागातून रेती तस्करी होत आहे.
विनापरवाना वाहतूकप्रकरणी साडेचार लाखांचा महसूल वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:28 IST