लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहर पोलिस ठाणे आणि सात मजली इमारतीमधील जागेला आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री स्व. गंगूबाई जोरगेवार यांच्या नावाने 'अम्मा चौक' हे नाव देण्याचा ठराव महानगरपालिकेने मंजूर केला.
ही जागा पुरातत्व विभागाच्या देखरेखीत असताना अशी मंजुरी देणे बेकायदेशीर असल्याचा आरोप करून शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी यांच्या नेतृत्वात काँग्रेसने शुक्रवारी (दि. १) कडाडून केला. पुतळ्याचे बांधकाम तातडीने थांबवावे, अशी मागणीही आयुक्तांकडे निवेदनातून केली आहे. चंद्रपुरातील सात मजली इमारत समोरील फुटपाथवर आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री स्व. गंगूबाई जोरगेवार (अम्मा) टोपल्या विकायला बसायच्या.
नावासाठी कुणी दिले निवेदन ?चंद्रपूर फुटपाथ दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजाबराव डंभारे आणि बुरड समाजाचे अध्यक्ष सुनील वासमवार यांनी १५ जानेवारी २०२५ रोजी मनपाकडे निवेदन देऊन त्या परिसराला 'अम्मा चौक' नाव देण्याची मागणी मनपाकडे केली होती. त्यावरून नगररचना सहायक संचालकांनी प्रस्ताव तयार केला. मनपा प्रशासनाने १३ फेब्रुवारी २०२२५ रोजी ठराव क्र. २३१ अनुसार हा ठराव पारीत केला आहे.
"हा परिसर पुरातत्व विभागांतर्गत येतो. तिथे कोणतेही बांधकाम करण्यास प्रतिबंध आहे. असे झाल्यास शहरातील ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला धोका पोहोचू शकतो. संबंधित बांधकाम तात्काळ थांबावे. या ठरावाविरोधात पुरातत्व विभागाकडेही तक्रार करू."- रामू तिवारी, शहर जिल्हाध्यक्ष काँग्रेस, चंद्रपूर