गोंधळातच आटोपली सभा : पदाधिकाऱ्यांविरुध्द काँग्रेस व भाजपा नगरसेवकांचे बंडचंद्रपूर: रिलायन्स जीओला ४ जी केबलसाठी खोदकाम करण्यासाठी दिलेली परवानगी नाकारावी, या मुद्यावरून सोमवारी झालेल्या आमसभेत चांगलाच गदारोळ झाला. सत्ताधारी काँग्रेस पक्ष्याच्या व भाजपाच्या नगरसेवकांनी प्रारंभी आक्रमक भूमिका घेऊन सभा तहकूब करण्याचा प्रयत्न केला. मात्र ज्येष्ठ नगरसेवकांनी मध्यस्ती केल्याने तसा प्रसंग आला नाही. एकूणच आजची सभा वादळीच ठरली.२९ मे रोजी झालेल्या आमसभेत रिलायन्स जीओ इन्फोकॉम कंपनीला ४ जी केबल टाकण्याच्या कामांना मंजुरी देण्यात आली होती. मात्र आमसभा लोटून पंधरवाडा झाल्यानंतर या कामाला विरोध होणे सुरू झाले. सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनीच या ठरावाविरोधात बंड पुकारले. काँग्रेसच्या २८ नगरसेवकांनी या संदर्भात एक प्रसिध्दी पत्रक काढून आपला विरोध दर्शविला होता. त्यानंतर ३० जून रोजी होणाऱ्या आमसभेत रिलायन्स जीओची परवानगी रद्द करावी, अन्यथा ४ जुलैला चंद्रपूर बंद ठेवण्याचा इशारा दिला.भारतीय जनता पक्षानेही यासंदर्भात एक प्रसिध्दीपत्रक काढून विरोधाला आपले समर्थन दर्शविले होते. या पार्श्वभूमिवर आज दुपारी १ वाजता महानगरपालिकेच्या सभागृहात आमसभा आयोजित करण्यात आली. आमसभेच्या प्रारंभीच काँग्रेसच्या नगरसेवकांनी रिलायन्स जीओच्या मुद्याला हात घातला. रिलायन्स जीओच्या खोदकामामुळे शहरात पुन्हा नवीन झालेल्या रस्त्यांचे बारा वाजणार आहे.या मोबाईल टॉवर्समुळे जनतेच्या आरोग्याला व पशुपक्ष्यांच्या जिविताला धोका निर्माण होणार आहे. याबाबत २९ मेच्या आमसभेत सांगण्यात आले नाही, असा आरोप नगरसेवकांनी केला. उपायुक्त राजेश मोहिते यांनी हे मान्य केले. त्यामुळे वाद आणखी वाढलुा. भूमिगत केबल टाकण्यामुळे दर ३० मीटरवर एक चेंबर बांधले जाणार आहे. त्यामुळे १०० कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या नवीन रस्त्यांची दुर्दशा होणार आहे, असे सांगत काँग्रेसच्या नगरसेवकांनी एकच गदारोळ केला. भाजपाच्या १६ नगरसेवकांनीही याला समर्थन दर्शविले.त्यामुळे अर्ध्यांपेक्षा जास्त नगरसेवक या ठरावाच्या विरोधात असल्याचे दिसून येत होते.टॉवर्स उभारणीचे काम आमसभेत मंजुरी मिळण्यापूर्वीच सुरू झाल्याचा आरोप राहुल पावडे यांनी यावेळी केला. गदारोळ वाढत जात असल्याने काही ज्येष्ठ नगरसेवकांनी गदारोळ करू नये, आपले मुद्दे कागदोपत्री व पुराव्यानिशी मांडावे, अशी मागणी केली. रिलयान्स जीओच्या टॉवर्समुळे रेडीएशन होत असल्याचा अहवाल तज्ज्ञांकडून आणावा, रेडीयएशन होत असेल तर मनपा या कामाला परवानगी देणार नाही, असे महापौर, उपमहापौर व स्थायी समिती सभापतींनी सांगितले. अखेर आजच्या आमसभेत रिलायन्स जीओला सध्या केबल टाकण्याची परवानगी देण्यात आली आहे. टॉवर्स उभारण्याला तुर्तास परवानगी देण्यात आली नाही, असे आमसभेच्या शेवटी सभागृहात सांगण्यात आले. (शहर प्रतिनिधी)
रिलायन्स जीओवरून गदारोळ
By admin | Updated: July 1, 2014 01:22 IST