आजची आमसभा गाजणार : ४ जुलैला बंदचे आवाहनचंद्रपूर: नगरसेवकांना विश्वासात न घेता रिलायन्स जीओला ४ जी केबल टाकण्यासाठी परवानगी देणे महापौर व स्थायी समिती सभापतींना चांगले भोवले आहे. सत्तारुढ काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनीच याविरोधात बंड पुकारले आहे. आता तर भाजपाने याला आपला विरोध दर्शविला असून ३० जूनच्या आमसभेत रिलायन्स जीओची परवानगी रद्द करावी, अशी आग्रही मागणी दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांनी केली आहे. असे न केल्यास ४ जुलैला चंद्रपूर बंद ठेवण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे उद्याची आमसभा चांगलीच गाजणार, हे निश्चित झाले आहे.२९ मे रोजी झालेल्या आमसभेत १०० मोबाईल टॉवर्सना मंजुरी देण्यात आली. याशिवाय भूमिगत केबल व चेंबर टाकण्यासाठी रिलायन्स जीओ मंजुरी देण्यात आली. यामुळे शहरात पुन्हा नवीन झालेल्या रस्त्यांचे बारा वाजणार आहे. या मोबाईल टॉवर्समुळे जनतेच्या आरोग्याला व पशुपक्ष्यांच्या जिविताला धोका निर्माण होणार आहे. याशिवाय अनेक समस्याही निर्माण होणार आहे. असे असताना यावर सविस्तर चर्चा न करता घाईगर्दीत ठराव पारित करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस नगरसेवकांच्या वतीने प्रशांत दानव व महेंद्र जयस्वाल यांनी केला आहे. नगर अभियंता बारई यांनी सभेत याबाबत चुकीची माहिती दिली, असाही त्यांचा आरोप आहे. शहरात नवीन रस्ते पूर्णत्वास येत आहेत. त्यात भूमिगत केबल टाकण्यामुळे दर ३० मीटरवर एक चेंबर बांधले जाणार आहे. त्यामुळे १०० कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या नवीन रस्त्यांची दुर्दशा होणार आहे.२७ मे रोजी नगरसेवकांची सभा झाली होती. या सभेला महापौरही उपस्थित होत्या. त्याचवेळी रिलायन्स जीओला खोदकाम करण्याची परवानगी देण्यात येऊ नये, असे ठरविण्यात आले. मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत २९ मेच्या आमसभेत मनपाचे काही नगरसेवक, विरोधी पक्षाचे नगरसेवक व काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने मंजुरी देण्यात आली. वास्तविक महानगरपालिकेच्या नियमानुसार सभेमध्ये कोणताही ठराव मंजूर झाल्यानंतर दुसऱ्या आमसभेत त्यावर पुन्हा चर्चा करण्यात येते. या सभेत कोणाचा विरोध नाही, याची खात्री झाल्यानंतर तो ठराव मंजूर केला जातो. असे असताना ३० जून रोजी होणाऱ्या आमसभेची वाट न बघता रिलायन्स जीओकडून अतिशय घाईत धनादेश जमा करून घेतले व त्यांना कामाचे वर्कआॅर्डरसुध्दा दिले, असे दानव यांनी म्हटले आहे. रिलायन्स कंपनीनेही आपल्या धनशक्तीचा वापर करून शहरावासियांच्या आरोग्याशी खेळ मांडला आहे. त्यामुळे हा ठराव उद्याच्या आमसभेत नामंजूर करावा, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)
रिलायन्स जीओला विरोध वाढला
By admin | Updated: June 29, 2014 23:49 IST