चंद्रपूर : मॅरेथॉनमध्ये सहभागी झाली. धावता धावता पडली आणि श्वास घेताना त्रास जाणवू लागला. त्यानंतर नाते आपुलकीच्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या पुढाकारातून डॉ. विनोद मुसळे आणि डॉ. सचिन धगडी यांनी या मुलीवर यशस्वी उपचार करीत जीवनदान दिले.
यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील मुरधोनी येथील रविना सोनटक्के (वय १८) ही वणी येथील मॅरेथॉन स्पर्धेत धावताना पडली. तिला श्वास घ्यायला त्रास जाणवू लागला. वणी येथे प्राथमिक उपचार केले. त्यानंतर चंद्रपूर येथील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये भरती केले. आयसीयूमध्ये तिच्यावर उपचार सुरू होता. मोलमजुरी करणारे सोनटक्के कुटुंबीयांनी मुलीच्या उपचारासाठी कर्जाऊ २० हजार रुपये आणले. उपचाराचा खर्च किती येईल, याचीच चिंता त्यांच्या चेहऱ्यावर होती. दोन दिवस लोटल्यानंतरही प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नाही. त्यामुळे उपचाराचे बिल ३२ हजार देऊन आईवडिलांनी सुटी मागितली. आता मुलीवर पुढील उपचार कसा करायचा, हा प्रश्न उभा ठाकला होता.
रविनाचे प्रशिक्षक योगेंद्र शेंडे, योगेश आसुटकर यांनी या सर्व प्रकाराची माहिती देत नाते आपुलकीचे संघटक राजेश पहापळे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर रविनाला तातडीने मुसळे हॉस्पिटलमध्ये भरती करण्यास सांगितले. संस्थेच्यावतीने पुढील उपचाराचा खर्च करू, असा धीर दिला. हृदयरोग तज्ज्ञ डॉ. सचिन धगडी व अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. विनोद मुसळे यांनी रविनावर योग्य उपचार करून तिला जीवनदान दिले. डॉ. मुसळे व डॉ. धगडी यांनी अल्पदरात उपचार केला. त्यानंतर नाते आपुलकीचे बहूद्देशीय संस्था चंद्रपूरच्यावतीने औषधोपचाराला लागणाऱ्या खर्चासाठी १५ हजारांची आर्थिक मदत केली. प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे शनिवारी रविनाला सुट्टी देण्यात आली. नाते आपुलकीचे बहूद्देशीय संस्थेचे संघटक राजेश पहापळे, सचिव प्रा. प्रमोद उरकुडे, किशोर तुराणकर, किसन नागरकर, हितेश गोहोकार, योगेंद्र शेंडे, योगेश आसुटकर, राजू तुराणकर, विराज चिकनकर, दिनेश मुरस्कर, राम ठावरी, योगेश मनगटे, कुणाल नित, पवन ढेंगळे, नयन भोज, पवन बुरान, विजय बोरकर, आकाश पुसनाके, गुड्डम, पूजा लोहारे, शीतल बांगडे, वैष्णवी भुरसे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.