गुन्हे दाखल : प्रहारच्या जिल्हाध्यक्षाचा प्रतापचंद्रपूर : येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील अवस्थेने त्रस्त विद्यार्थ्यांनी उपोषण सुरू केले. याबाबत जाब विचारण्यासाठी गेलेले प्रहारचे जिल्हाध्यक्ष पप्पू देशमुख यांनी वॉर्डन अशोक जाधव यांच्या कानशिलात लगावल्याने प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले. याप्रकरणी जाधव यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली असून पोलिसांनी पप्पू देशमुख व त्यांच्या कार्यकर्त्यांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. दाताळा मार्गावरील शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहात विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. याला तेथील वार्डन अशोक जाधव हेच जबाबदार असल्याचा विद्यार्थ्यांनाचा आरोप आहे. या विरुद्ध विद्यार्थ्यांनी १४ आॅगस्टपासून उपोषण सुरू केले होते. १५ आॅगस्टला त्याची सांगता झाली. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी शुक्रवारी प्रहारचे जिल्हाध्यक्ष पप्पू देशमुख व त्यांचे काही कार्यकर्ते वसतीगृहात गेले होते. यावेळी देशमुख व वॉर्डन अशोक जाधव यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. त्यात पप्पू देशमुख यांनी मारहाण केली, असा आरोप अशोक जाधव यांनी तक्रारीतून केला आहे. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी देशमुख व त्यांच्या सहकाऱ्याविरुद्ध भादंवि ३५३, ४५२, ३३२, ३२३, २९४, ५०६ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. अद्याप कुणालाही अटक झाली नाही. मागील १५ दिवसांपासून येथे कार्यरत सफाई कामगार न आल्याने वसतिगृहाला उकीरड्याचे स्वरुप आले आहे.त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. यासोबत अनेक समस्या आहेत. (प्रतिनिधी)
वॉर्डनच्या कानशिलात लगावली
By admin | Updated: August 16, 2014 23:23 IST