सचिन सरपटवार भद्रावतीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सांसद आदर्श गाव योजनेत केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या लोकसभा क्षेत्रातून चंदनखेडा या ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली. चंदनखेडा ग्रामपंचायतीसाठी ११ कोटी रुपयांची विकास कामे प्रस्तावित असून येत्या दोन वर्षांत ही कामे पूर्ण होणार आहेत. सांसद आदर्श ग्राम चंदनखेडा येथे आतापर्यंत ११.८५ लाख रुपयांची कामे प्रस्तावित असून विविध विकासात्मक कामांना मंजुरी मिळाली आहे. काही कामे सुरू झाली आहेत तर काही कामे पूर्णत्वाला आली आहेत. यामध्ये व्यायमशाळेसाठी सात लाख रुपये तसेच क्रीडांगण निर्मितीकरिता साह लाख रुपये प्राप्त झाले आहेत.सिंचन व्यवस्थेच्या दृष्टीने १२ सिमेंट नाला बंधाऱ्यांची दुरुस्ती, खोलिकरण, गाळ काढणे यासाठी ७० लाख रुपये, नाल्यावर लघुसिंचन (जलसंधारण) विभागाकडून नवीन तीन सिमेंट नाला बंधाऱ्यासाठी ४३.३९ लाख रुपये मंजूर झाले आहेत. इरई नदीवर तीन कोल्हापुरी बंधारे बांधकामासाठी सर्वेक्षण पूर्ण होऊन ३५५.६२ लाखांचा प्रस्ताव सादर करण्यात आला. बसस्थानकामागील ११ लाख रुपये खर्चाच्या तलाव खोलिकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. शेततळेसाठी ६० लाख तर बोडी नुतनीकरणासाठी २० लाख रुपये मंजुर झाली आहेत. चारगाव मध्यम प्रकल्पाच्या मायनर किमी १ व २ वरील सिंचन पुनर्स्थापनेकरिता दुरुस्ती व मजबुतीकरणासाठी ४९.८४ लाख मंजुर झाले असून काम सुरु आहे.माधव महाराज देवस्थान येथे खासदार निधीतून हातपंपाचे काम पूर्ण झाले आहे. केंद्रीय रस्ते निधीतून (सीआरएफ) भद्रावती चंदनखेडा रस्ता रुंदीकरणासाठी २२ कोटी रुपये मिळणार असून त्यातील पाच कोटी रुपये मंजूर झाली आहे. कृषी मंडळ कार्यालय व पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नवीन इमारत बांधकामाचा प्रस्ताव तयार झाला आहे. वनविभागाकडून वनउपज केंद्र स्थापन्यास मान्यता मिळाली असून गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी शौचालय बांधकाम सुरू झाले आहे. २४ तास शुद्ध पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व ग्रामिण पाणी पुरवठा विभागाला प्रस्ताव तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहे. आष्टा मार्गावरील स्मशानभूमीला जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण, हातपंप व शेड निर्मितीस मान्यता देण्यात आली आहे. महिला बचत गटांना स्वयंरोजगारासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण दिले जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ग्रामपंचायतीअंतर्गत विविध रस्त्यांचे बांधकामासाठी २८७.५० लाखाची अंदाजपत्रक तयार आहेत. पोलीस दूरक्षेत्र केंद्रास मान्यता मिळाली आहे. तसेच ग्रामपंचायतीला ब्रॉडबॅन्ड सुविधा उपलब्ध झाली आहे.यासोबतच नरेगाअंतर्गत रोपवाटीकांमध्ये रोपे तयार करणे सुरू आहे. स्वच्छता भारत मिशन अंतर्गत ७५ टक्के शौचालयाची कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे सुरू आहे. बोरगाव (धांडे), चरुर धारापूरे ही गाव टॅक्टरमुक्त झाली असून जलयुक्त शिवाराची कामे सुरु आहेत.
११ कोटींची विकास कामे प्रस्तावित
By admin | Updated: May 20, 2015 01:50 IST