आनंदाची उधळण : ना. सुधीर मुनगंटीवार यांचे प्रथम नगरागमन चंद्रपूर : राज्याचे वित्तमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यावर ना. सुधीर मुनगंटीवार यांचे जिल्ह्यातील प्रथम आगमनानिमित्त स्वागत न भूतो न भविष्यती ठरले. जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या खांबाड्यापासून सुरू झालेली त्यांच्या स्वागताची अखंड मालिका थेट त्यांच्या चंद्रपुरातील स्वगृहापर्यंत कायम होती. त्यांच्या जंगी स्वागताने चनद्रपुरात सायंकाळी दिवाळी अवतरली होती. चंद्रपूरकर जनता त्यांच्या स्वागतासाठी रस्त्यावर उतरल्याने रस्त्यावरही त्यांच्या स्वागतासाठी जनसागर अवतरला होता.प्रथम चंद्रपूर जिल्ह्यातील खांबाडा गावात ना. सुधीर मुनगंटीवारांचे स्वागत जिल्ह्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांनी केले. यावेळी खांबाडा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेचे त्यांनी पूजन केल्यानंतर खांबाडा परिसरातील जनतेचे त्यांचे स्वागत केले. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. टेमुर्डा या गावातील कार्यकर्त्यांनी ना. मुनगंटीवारांचा कमळाच्या फुलाचा हार घालून सत्कार केला. वरोरा येथील आनंदवन चौकात त्यांचे दोन तास उशिराने आगमन झाले. संजय देवतळे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बाबा भागडे, वरोरा तालुका भाजपा अध्यक्ष डॉ. भगवान गायकवाड, अॅड. मिलींद देशपांडे, ओमप्रकाश मांडवकर, सुवर्णरेखा पाटील, सुनिता काकडे, विजय मोकाशी, रविंद्र कष्टी, बाळू भोयर आदींनी तिथे त्यांचे स्वागत केले. यावेळी ना. मुनगंटीवार यांनी चांदा ते बांदापर्यंतचा विकास करायचा आहे. त्याकरिता थोडा वेळ लागेल. परंतु विकासाचा महामेरु सुरू झाला आहे. यावेळी सर्वांनी सोबत राहाण्याचे आवाहनही केले. नागपूर- चंद्रपूर मार्गालगत वरोरा तालुका आर्य वैश्य समाजाच्या वतीनेही ना. सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार करण्यात आला. नंदोरी येथील बसस्टँडवर ग्रामपंचायतीच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी आणि नंदोरी व परिसरातील गावकऱ्यांनीही त्यांचे स्वागत केले. यावेळी आपल्या छोटेखानी भाषणात त्यांनी विकासाची ग्वाही दिली.भद्रावतीतही जल्लोषभद्रावती येथील बसस्टँड चौकात सायंकाळी ५ वाजता त्यांचे आगमन झाले. बँडच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. ते म्हणाले, केंद्रात भाजपाचे, राज्यात भाजपाचे सरकार आले. फक्त भद्रावतीत गडबड झाली. परंतु भद्रावतीतही सत्ता आणू, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. नगराध्यक्ष अनिल धानोरकर, मुख्याधिकारी डॉ. विजय इंगोले, भाजपाचे चंद्रकांत गुंडावार, केशव लांजेकर, विजय वानखेडे, अफजलभाई, इम्रान खान, कामरान खान, गोपाल गोसवाडे, चंदू खारकर, यासह असंख्य कार्यकर्त्यांनी पुष्पमालांनी स्वागत केले. मार्गात घोडपेठ, ताडाळी, पडोली, घुग्घुस फाटा, उर्जानगर चौक, गजानन महाराज मंदीर चौक, जनता कॉलेज चौक, वरोरा नाका, विश्रामगृह, प्रियदर्शिनी चौक, जटपुरा गेट, या ठिकाणीही त्यांचे भव्य स्वागत झाले. फटाक्यांच्या आतीशबाजीने शहर उजळून निघाले. युवावर्गही या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. ठिकठिकाणी फुले उधळून आणि पंचारतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी त्यांच्यासोबत आमदार नाना श्यामकुळे, आमदार बंटी भांगडिया, सपना मुनगंटीवार, भाजपाचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. जटपुरा गेटमधून महात्मा गांधी मार्गावरून खुल्या वाहनातून त्यांची शहरातून भव्य रॅली निघाली. प्रत्यक्षात त्यांचे गांधी चौकात सायंकाळी ५ वाजता आगमन होणार होते. त्यामुळे सायंकाळपासूनच कार्यकर्ते आणि नागरिक रस्त्यावर जमले होते. मात्र ठिकठिकाणचे स्वागत स्वीकारत ते गांधी चौकात रात्री ९ वाजता पोहचले. गांधी चौकात ही रॅली पोहचल्यावर तिथे त्यांचा भव्य पुष्पहाराने जाहीर सत्कार करण्यात आला. अनेकांनी सोबत आणलेले बुके देऊन त्यांचा सत्कार केला. सत्कार करण्याऱ्यांची या ठिकाणी रिघ लागली होती. (लोकमत चमू)
चंद्रपूरकरांतर्फे उत्स्फूर्त स्वागत
By admin | Updated: November 3, 2014 23:22 IST