चंद्रपूर: राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असतानाही विदर्भ राज्य स्थापन करण्यासंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट करायला सरकार तयार नाही. विदर्भ राज्याचे विरोधकही विदर्भाच्या बाबतीत नकारात्मक भूमिका घेऊन वागत आहेत. त्यामुळे जनतेने संघटीत होऊन विदर्भमुक्ती यात्रेच्या समारोपीय कार्यक्रमात सरकारला आणि विदर्भाच्या विरोधकांना खणखणित इशारा देण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन जनमंचचे पदाधिकारी आणि ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखेडे यांनी बुधवारी येथे झालेल्या विदर्भवाद्यांच्या सभेत केले.वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी जनमंच संघटनेच्या वतीने विदर्भ मुक्ती यात्रा काढली जाणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथून २० सप्टेंबरला ही यात्रा सुरू होऊन समारोप २१ सप्टेंबरला नागपुरातील दीक्षाभूमीवर होणार आहे. या संदर्भात माहिती देण्यासाठी जनमंचच्या वतीने बुधवारी दुपारी स्थानिक ज्येष्ठ नागरिक संघात विदर्भवाद्यांची सभा पार पडली. यात गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमेटीचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश इटनकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रामदास रायपुरे, उपाध्यक्ष विजय चंदावार, सचिव केशवराव जेनेकर, नगरसेवक प्रशांत दानव आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी बोलताना वानखेडे म्हणाले, समारोपिय कार्यक्रमाला तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव उपस्थित यांना पाचारण केले आहे. या यात्रेमध्ये सुमारे ५०० चारचाकी वाहनांसह शेकडो दुचाकीस्वार सहभागी होणार आहेत. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचा आवाज बुलंद व्हावा यासाठी युवक, नागरिकांनी आपल्या वाहनांसह सहभागी व्यावे. मात्र त्यापूर्वी आपण कुठून सहभागी होणार याची आणि आपल्या वाहनाची नोंद जनमंचकडे करावी, असेही यावेळी सांगण्यात आले. बैठकीला गोपालराव सातपुते, विठ्ठलराव भोंगळे, प्रभाकर घट्टूवार, नगरसेविका धांडे आदी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)
विधानसभा निवडणुकीपूर्वी विदर्भ विरोधकांना खणखणीत इशारा द्या
By admin | Updated: September 10, 2014 23:33 IST