कोरपना: भारतीय संस्कृतीतील गायीला मातेचे स्थान दिले जाते. परंतु काही दलालांमार्फत या गो-मातेला कसायाच्या हाती सोपविले जाते. परिणामी गोवंशाच्या होणाऱ्या बेसूमार कत्तलीमुळे बैलांची संख्यावाढ घटली आहे. त्यामुळे बैलजोडीच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गुरांच्या बाजारात आता बैल जोडीच्या किंमती गगनाला भिडल्या असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. गोवंशाची कत्तल करणारे किंवा अवैधरित्या विक्री करणारे दलाल विविध भागात सक्रीय आहेत. परंतु त्याहच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने गोवंश संपविण्याचे काम बेधडकपणे सुरू आहे. बाजारामध्ये १२ ते १८ हजार रुपये किंमत होती. मात्र ती आता ५० ते ६० हजारांच्या घरात पोहचली आहे. चांगल्या प्रतिच्या बैलजोडीची किंमत ७० हजारांपर्यंत तर पटाच्या बैलाची किंमत लाखाच्या घरात गेली आहे. आर्थिक आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला बैलाच्या वाढत्या किंमतीमुळे जबरदस्त फटका बसत आहे. शेतकऱ्याचे जिवन ज्या गोमातेवर चालते, त्या गोमातेला अशा प्रकारे कत्तलखान्यात पाठविण्यापेक्षा घरातील वृद्धाप्रमाणे त्याचेही पालन पोषण शेतकऱ्यांनी केले पाहिजे. मात्र तसे होत नाही. गावरान गाईपासून तयार झालेल्या बैलजोड्यांना शेतकऱ्यांकडून मोठी मागणी असताना अशा बैलजोडींची टंचाई निर्माण झाली असून बाजारात विक्रीस येणाऱ्या तरुण बैलजोडीची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने शेतकऱ्यांना शेतीसाठी मोठी अडचण येत असल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले. विज्ञानाने कृषी क्षेत्रात जरी प्रगती केली असली तरी अद्यापही बहुतांश शेतकरी बैलाद्वारेच शेती करतात. वाढत्या किंमतीमुळे शेतीसाठी चांगले बैल आणावे कुठून, हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. गोवंशाची मोठ्या प्रमाणात होणारी कत्तल याला कारणीभूत असून गोहत्तेवर केवळ कायद्याने बंदी न आणता प्रत्यक्षात गोहत्या थांबविण्यासाठी प्रयत्न व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (शहर प्रतिनिधी)
कत्तलीमुळे बैलजोडीच्या किंमती वधारल्या
By admin | Updated: February 5, 2015 23:07 IST