चंद्रपूर : पोलिसांनी गुरुवारी रात्री विशेष मोहीम राबवून जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रतिबंधात्मक कारवाई केली. यामध्ये कलम १०७ दंड प्रक्रियाअन्वये १३, कलम ११०, ११७ मुंबई पोलीस कायदा अन्वये तीन, कलम १६ दारूबंदी कायदा अन्वये एक अशा एकूण ३६ जणांवर प्रतिबंधक कारवाई केली.
नऊ विनापरवाना वाहनधारकांवर कारवाई
चंद्रपूर : विनापरवाना वाहन चालविणाऱ्या नऊजणांवर शहर पोलिसांनी गुरुवारी रात्री प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहाजवळ कारवाई केली. सर्व आरोपी शहरातील विविध वाॅर्डांतील रहिवासी आहेत.
............................
पडोली परिसरात जुगारावर धाड
चंद्रपूर : पडोली परिसरात जुगार अड्ड्यावर धाड टाकून पोलिसांनी गुरुवारी (दि. ३१) सायंकाळी पाच वाजता चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपींकडून पाच हजारांसह मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींवर मुंबई जुगार प्रतिबंधात्मक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
तुकूम परिसरात डुकरांचा हैदोस
चंद्रपूर : तुकूम परिसरातील विविध वॉर्डांत डुकरांचा हैदोस सुरू आहे. रात्रीच्या सुमारास ती अंगणात धुडगूस घालतात. उपगन्लावार लेआऊट परिसरात डुकरांचा हैदोस वाढला आहे. त्यामुळे महापालिकेने मोकाट डुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी तुकूम परिसरातील नागरिकांनी केली आहे.
कॉलरी वॉर्डातील रस्त्याची दुरवस्था
वरोरा : शहरातील कॉलरी वॉर्डातील कल्यानेश्वर हनुमान मंदिरासमोरील रस्ता उखडला. अनेक ठिकाणी खड्डे पडले. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. दुचाकीस्वार व पादचारी खड्ड्यात पडून जखमी झाले आहेत. याकडे नगरपालिका प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली.
स्वच्छता कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित
नागभीड : नगर परिषदेअंतर्गत कार्यरत स्वच्छता कामगारांची शैक्षणिक पात्रता असतानाही अद्याप पदोन्नतीचा प्रश्न निकाली काढण्यात आला नाही. त्यामुळे पात्र कर्मचाऱ्यांना वंचित राहावे लागत आहे. अर्हताधारक सफाई कामगारांची पदोन्नती करावी, अशी मागणी महाराष्ट्र सफाई कामगार संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे.