भिसी : येथील वेदांती अशोक दारुनकर या चार वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याच्या घटनेने गंभीर वळण घेतले आहे. मृत्यूनंतर कुटुंबीयांनी तिचा दफनविधीही केला. त्यानंतर ही घटना पसरताच नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्री एक वाजेपर्यंत ठिय्या आंदोलन केले. डॉक्टरवर कारवाईची मागणी केली. दरम्यान मुलीच्या वडिलांनी पंचनामा करण्याची मागणी केल्याने आज बुधवारी सकाळी अंत्यसंस्कार केलेला मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या घटनेमुळे भिसीमध्ये तणाव निर्माण झाला आहे.येथील अशोक दारुनकर यांची चार वर्षीय मुलगी वेदांती हिला दोन दिवसापूर्वी ताप आला होता. त्यामुळे तिच्या वडिलांनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवारी सकाळी ९ वाजता उपचारासाठी आणले. उपस्थित डॉक्टर डॉ. सुजाता गुप्ता यांनी उपचार करून घरी पाठविले. मात्र काही वेळातच ती चक्कर येऊन पडली. त्यानंतर पुन्हा उपचारासाठी आणण्यात आले. मात्र यावेळी डॉक्टर रुग्णालयात उशिरा पोहोचल्याने तिचा मृत्यू झाला होता. मुलीवर योग्य उपचार झाला नसल्याची खंत वडिलांना होती. त्यांनी याबाबतची माहिती कुटुंबीयांसह गावातील नागरिकांना दिली. यानंतर जिल्हा परिषद सदस्या पार्वता गभणे, सरपंच ढोबे, तंटामुक्त समिती अध्यक्ष गोपीनाथ ठोंबरे, सदस्य अरविंद रेवतकर, लिलाधर बन्सोड यांनी डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी करीत पोलिसात तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य ओळखून ठाणेदार मांडवकर यांनी अतिरिक्त पोलिसांना पाचारण केले. दरम्यान बुधवारी सकाळी जिल्हा परिषद सदस्य सतीश वारजुकर, जिल्हा परिषद सदस्य नन्नावरे, स्वप्नील मालके, गावंडे यांनी मुलीचे वडिल अशोक दारुनकर यांची भेट घेतली. त्यानंतर डॉक्टरवर निलंबनाची मागणी केली. तर अशोक दारुनकर यांनी मुलीच्या पार्थिवाचा पंचनामा करावा, अशी मागणी केली. तहसीलदारांनी मागणी मान्य करीत बुधवारी दुपारी ३.१५ वाजता दफन करण्यात आलेला मृतदेह बाहेर काढला. शवविच्छेदनासाठी मृतदेह चिमूरला पाठविण्यात आला. या घटनेमुळे गावात तणाव निर्माण झाला असून डॉक्टरविरुध्द रोष व्यक्त करण्यात येत आहे. सध्या गावातील परिस्थिती तणावात मात्र नियंत्रणात आहे.(वार्ताहर)
बालिकेच्या मृत्यूवरून भिसीमध्ये तणाव पुरलेल्या मृतदेहाचे शवविच्छेदन
By admin | Updated: August 13, 2014 23:44 IST