चंद्रपूर : विधानसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदान व्हावे, प्रत्येक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, याकरिता महसूल प्रशासन व महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर शहरात मतदार जनजागृती सायकल रॅली काढण्यात आली. या सायकल रॅलीमध्ये जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी स्वत: सायकल स्वारी करून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. मतदान करणे आवश्यक का, या विषयी विविध घोषवाक्यांची घोषणा करून मतदारामध्ये जनजागृती करण्यात आली. मतदार जनजागृती रॅलीची सुरुवात गांधी चौकात करण्यात आली. लहान बालिकेने रॅलीला हिरवी झेंडी दाखविली. रॅली आंबेडकर चौक, बिनबा गेट, नेहरू शाळा, जटपुरा गेट, रामाळा तलाव परिसर, गंजवार्ड, अंचलेश्वर गेट, समाधी वार्ड, पठाणपुरा वार्ड या मार्गाने फिरुन गांधी चौकात रॅलीचा समारोप करण्यात आला. या मतदार जनजागृती सायकल रॅलीमध्ये मनपा आयुक्त सुधीर शंभरकर, उपआयुक्त राजेश मोहिते, प्रकल्प अधिकारी सुरेश वानखेडे, इकोप्रोचे बंडू धोत्रे, डॉ. मंगेश गुलवाडे, शहर कुस्ती संघ, जगन गुरु व्यायाम शाळा, अॅथोलेटिक असोशियन, चंद्रपूर सायकल क्लब, आदिवासी वस्तीगृह शाळांचे विद्यार्थी-विद्यार्थीनी व शहरातील नागरिक सहभागी झाले होते.सर्व मतदारांनी १५ आॅक्टोबरला आपण स्वत: अवश्य मतदान करुन शेजारी मित्र, नातेवाईक यांना सुद्धा मतदान करण्याचा आग्रह करावा व सर्व मतदारांनी शंभर टक्के मतदान करण्याकरिता प्रयत्न करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले. (स्थानिक प्रतिनिधी)
सायकल रॅलीतून मतदान जनजागृती
By admin | Updated: October 12, 2014 23:42 IST