चंद्रपूर : पुण्यात १८४८ मध्ये फुल्यांनी क्रांती शाळा सुरू केली. या शाळेचे राष्ट्रीय स्मारक करण्यात यावे, ही आपली प्रमुख मागणी आहे. असे अनेक प्रश्न घेऊन गेल्या काही वर्षांपासून समाजकारण सुरू आहे. मात्र फुल्यांचे वंशज म्हणून आम्ही उचलून धरलेल्या प्रश्नांकडे राज्य सरकार दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे समाजकारणातून प्रश्न सुटत नाही त्यासाठी राजकारणसुद्धा करावे लागते, या जाणिवेपर्यंत मी पोहोचले आहे. असे महात्मा जोतिबा फुले यांच्या वंशज (पणतू सून) नीता होले यांनी शनिवारी येथे स्पष्ट केले.भाजपातर्फे आयोजित एका कार्यक्रमासाठी त्या चंद्रपुरात आल्या होत्या. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या, महात्मा फुल्यांचे राजकीय वंशज आम्हीच असल्याचा देखावा करणाऱ्या समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांचा खोटेपणा उघड झाला आहे. मुनगंटीवार यांच्या निमित्ताने सहाजिकच भारतीय जनता पक्षाचे नाते दृढ झाले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने येवला विधानसभा क्षेत्रातून छगन भुजबळ यांच्या विरोधात निवडणूक लढण्याची संधी दिली तर आपल्याला निश्चितच आनंद होईल. असेही निता होले यावेळी म्हणाल्या.येवला मतदार संघातून उमेदवारी मिळावी म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि आ. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे तसा प्रस्तावही ठेवला आहे. पुणे विद्यापिठाच्या नामांतर सोहळ्याला आमदार सुधीर मुनगंटीवार आणि आपल्याला बोलावण्यात आले नव्हते. पुणे विद्यापीठाच्या नामांतराचे श्रेय घेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना सावित्रीबाई फुल्यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवलेली क्रांती शाळा नेमकी कुठे आहे, तेसुद्धा माहीत नाही. अशा राजकारण्यांकडून अपेक्षा करायची तरी काय, असा प्रश्नही नीता होले यांनी यावेळी उपस्थित केला. (शहर प्रतिनिधी)
समाजकारणासोबत राजकारणही आवश्यक
By admin | Updated: August 16, 2014 23:22 IST