चंद्रपूर : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम अंतर्गत मनपा आरोग्य विभागाकडून रविवारी शहरातील ० ते ५ वर्षे वयोगटातील ३८ हजार ८ बालकांना सकाळी आठ ते संध्याकाळी पाच वाजजेपर्यंत पोलिओ लस देण्यात येणार आहे. याबाबत मनपास्तरीय समन्वय समितीची बैठक गुरुवारी स्थायी समिती सभागृहात पार पडली.
यावेळी मनपाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आविष्कार खंडारे, डॉ. वनिता गर्गेलवार, डॉ. विजया खेरा, डॉ. जयश्री वाडे, डॉ. अश्विनी भारत, डॉ. नयना उत्तरवार, डॉ. योगेश्वरी गाडगे, डॉ. शरयू गावंडे, डॉ. अभिलाषा गावतुरे, डॉ. चंद्रागडे, नरेंद्र जनबंधू, नागेश नीत, शारदा भुक्या, ग्रेस नगरकर व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
शहरातील बुथ, अंगणवाडी, शाळा, बस स्टँड, रेल्वे स्टेशन, टोलनाके, सर्व रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र या सर्व ठिकाणी लस देण्यासाठी पथक सज्ज राहणार आहे. बाळ नुकतेच जन्मलेले असेल, यापूर्वी डोस दिला असेल किंवा बाळ आजारी असले तरी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने पोलिओ लस देण्यात येणार आहे. स्थलांतरित व बांधकामावरील मजुरांच्या बालकांना लस देण्यासाठी १९ मोबाईल पथक तयार राहणार आहे. बसस्थानक, रेल्वे स्थानक, यात्रास्थळावर २७ चमूकडून लसीकरण होईल. नागरिकांनी आपल्या बालकांना पल्स पोलिओचा डोस द्यावा, असे आवाहन महापौर राखी कंचर्लावार व आयुक्त राजेश मोहिते यांनी केले.
८०० कर्मचारी व स्वयंसेवक
घरोघरी जाऊन लस देण्याकरिता १८९ पथके सज्ज आहे. ३१७ बूथ टीमकरिता प्रत्येकी पाच बुथकरिता एक पर्यवेक्षक याप्रमाणे ६३ पर्यवेक्षकांची नियुक्ती झाली. लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांसाठी २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान घरी भेट देऊन लसीकरण करण्यास ३७ पर्यवेक्षक काम पाहतील. वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहायक, परिचारिका, आरोग्य सेविका, आशा वर्कर, सामान्य रुग्णालय नर्सिंग स्कूल व खासगी नर्सिंग स्कूल विद्यार्थी, अंगणवाडी सेविका, मदतनीस व स्वयंसेवक असे एकूण ८०० कर्मचारी व स्वयंसेवक मोहिमेत कार्यरत राहतील, अशी माहिती मनपाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आविष्कार खंडारे यांनी दिली.
मोहिमेंतर्गत नागरिकांनी आपल्या बालकांना पल्स पोलिओचा डोस द्यावा व राष्ट्रीय कार्यक्रमात महत्त्वपूर्ण योगदान देण्याचे आवाहन महापौर राखी कंचर्लावार व आयुक्त राजेश मोहिते यांच्यामार्फत करण्यात येत आहे.