गडचांदूर : आवाळपूर ते बिबी पर्यतचा तीन किमीचा रस्ता पूर्णत: उखळला असून या मार्गावरुन अल्ट्राटेक सिमेंट कंपनीमध्ये दररोज ४०० ते ५०० ट्रकांची ये-जा असते. धुळीमुळे या परिसरातील लोकांचे जीवन असह्य झाले असून रस्ता खराब असल्याने अनेक अपघात या मार्गावर घडत आहेत. अपघातामुळे प्राणहाणी सुद्धा झालेली आहे. मात्र रस्त्याच्या दुरूस्तीकडे संबधीत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या रस्त्याकरिता २०१३ मध्ये नागरिकांनी आंदोलन सुद्धा केले होते. मात्र तरी सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग या बाबीकडे सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. या रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी युवक काँग्रेसचे अभय मुनोत व हारुण सिद्दीकी यांनी बांधकाम विभागाकडे केली आहे.नांदाफाटा बाजारपेठेमधील रस्ताही पुर्णत: उखळला असून या रस्त्यावर ट्रकांची २४ तास वर्दळ सुरू असते. धुळीमुळे नागरिकांना व लहान मुलांना विविध आजार होत आहे. नांदाफाटा येथे रस्त्याचे रुंदीकरण करुन डांबरीकरण करण्याची गरज आहे. पावसाळ्यात पाणी रस्त्यावर साचत असल्यामुळे रस्त्याची दयनिय अवस्था होते. पाण्याचा निचरा होण्याकरिता ड्रेनेज नाही. एका बाजूची ड्रेनेज अल्ट्राटेक कंपनीने नुकतीच बांधून दिलेली आहे. दुसऱ्या बाजूनेही ड्रेनेज बांधून देण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.बिबी ते आवाळपूर हा रस्ता अरुंद असल्याने वाहतूक करण्यास अडचण येत आहे. दररोज हजारो नागरीक ये-जा करतात, मात्र रस्त्याची दुरूस्ती व रूंदी वाढलेली नाही. या मार्गावर रस्ता दुभाजक तयार केल्यास अपघातावर नियंत्रण मिळविता येईल. हिच गत हिरापूर ते आवाळपूर रस्त्याचीही आहे. या मार्गावर दुचाकी चालवने अवघड जात असून हिरापूर ते आवाळपूर रस्त्याचेही डांबरीकरण करण्याची गरज मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)
बिबी-आवाळपूर रस्त्याची दयनीय अवस्था
By admin | Updated: May 2, 2015 01:13 IST