दररोज शेकडो रुग्णांची नोंदणी : मूल येथे ११ वर्षांपासून वैद्यकीय अधीक्षकाचे पद रिक्तमूल : रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने मूल येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर करून १०० खाटांचे श्रेणी वर्धीत रुग्णालय दिले. मात्र आजच्या स्थितीत तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती येथे केलेली नसल्यामुळे अनेक रुग्णांची हेडसांड होत आहे. बहुतांश रुग्णांना रेफर टू चंद्रपूर, गडचिरोली केल्या जात आहे. त्यामुळे रूग्णांमध्ये रोष पसरला आहे.जागतिक बँक अर्थसहाय्यीत महाराष्ट्र आरोग्य विकास प्रकल्पांतर्गत येथील ग्रामीण रुग्णालयाचे रुपांतर उपजिल्हा रुग्णालयामध्ये करण्यात आले आहे. तत्कालिन आरोग्य मंत्री डॉ. दिग्विजय खानविलकर यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा ५ मे २००२ रोजे मोठ्या दिमाखात पार पडला होता. यावेळी तत्कालिन आरोग्य राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथराव गायकवाड, तत्कालिन खासदार नरेश पुगलिया, तत्कालिन आमदार शोभाताई फडणवीस उपस्थित होते. दरम्यान उपस्थित मान्यवरांनी सदर रुग्णालयात स्त्री रोग तज्ञ, बालरोग तज्ञ, बधिरीकरण तज्ञ, शल्यचिकित्सक हे महत्त्वाचे पद नेहमीसाठी भरण्यात येईल, असे आश्वासन यावेळी दिले होते. परंतु १४ वर्षाचा कार्यकाळ लोटून गेला. मात्र बालरोग तज्ञ सोडले तर एकही तज्ञ डॉक्टरांची पदे येथे भरण्यात आलेली नाही. येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकाचा प्रभार डॉ. अनिल गेडाम यांच्याकडे मागील वर्षांपासून आहे. तर वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. देवेंद्र लाडे, डॉ. उज्वलकुमार इंदूरकर हे कर्तव्य बजावित आहे.मात्र तज्ञ डॉक्टर नसल्याने रुग्णांची तारांबळ उडत आहे. सदर रुग्णालयात रोज किमान ४०० ते ५०० च्या जवळपास रुग्णांची नोंदणी होत आहे. सदर रुग्णालयात आयुष क्लिनीक कार्यरत आहे. रुग्णांची संख्या पाहात आयुष मधील डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी केली जात आहे. राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांच्याच गृहक्षेत्रातील मूल येथील जिल्हा रुणालयाला डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदाचे ग्रहण लागलेले असूून त्यांनी पुढाकार घेत रिक्त पदांची समस्या तत्काळ सोडवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (शहर प्रतिनिधी)
तज्ज्ञ डॉक्टरांच्या रिक्त पदांमुळे रुग्णांची हेळसांड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2016 00:50 IST