चंद्रपूर : आरटीई अॅक्टनुसार जिल्हा परिषद शिक्षकांचे समायोजन करण्यात आले होते. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक शिक्षक तसेच मुख्याध्यापक अतिरिक्त ठरले. त्यामुळे अनेकांना मनस्तापही सहन करावा लागला. दरम्यान, काही शिक्षकांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने समायोजन झालेल्या शिक्षकांना ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणीच पुढील आदेशापर्यंत राहण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे शिक्षकांना काही दिवसासाठी का होईना दिलासा मिळाला आहे. मात्र काही शिक्षक समायोजन झाल्यानंतर त्या ठिकाणी रुजू झाले आहे. त्यामुळे त्यांना त्याच ठिकाणी काम करावे लागणार आहे.जिल्हा परिषदेंतर्गत चालविण्यात येणाऱ्या जिल्ह्यातील शाळांमधील शिक्षकांचे मागील दोन महिन्यांपासून समायोजन प्रक्रिया सुरु आहे. मात्र या प्रक्रियेमध्ये अनेक अळथडे आल्याने ही प्रक्रिया अद्यापही सुरुच होती. जिल्ह्यात ५०० च्या वर मुख्याध्यापक आहे. त्यातील अर्धेअधिक मुख्याध्यापक अतिरिक्त ठरले. तसेच सहाय्यक शिक्षकही अतिरिक्त आहे. त्यामुळे समायोजन करताना जिल्हा परिषद प्रशासनाला अनेक अडचणी आहे. काही संघटनांनी आक्षेप घेतल्यामुळे शासनाकडून माहितीही मागविण्यात आली होती. त्यानंतर समायोजन झालेल्या मुख्याध्यापकांव्यतिरिक्त अतिरिक्त ठरलेल्या मुख्याध्यापकांना पदनावत करण्यात आले. त्यामुळे शिक्षकांना नाईलाजाने काम करावे लागत होते. काही शिक्षक समायोजन झालेल्या ठिकाणी रुजू झाले. तर काहींना आदेश मिळाले नसल्याने ते पूर्वीच्याच ठिकाणी कार्यरत आहे. दरम्यान काही शिक्षकांनी झालेल्या अन्यायासंदर्भात न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत समायोजन झालेल्या शिक्षकांना जैसे थे चे आदेश दिले आहे. त्यामुळे शिक्षकांना काही दिवसांसाठी का होईना दिलासा मिळाला.शिक्षकांचे न्यायालयाच्या पुढील आदेशाकडे लक्ष लागले आहे.(नगर प्रतिनिधी)
शिक्षकांच्या समायोजनाबद्दल न्यायालयाचा ‘जैसे थे’ चा आदेश
By admin | Updated: August 14, 2014 23:38 IST