भद्रावती शहरात भुरट्या चोरट्यांचा सुळसुळाट आहे. नालीवरील लोखंडी चेंबर, घरासमोरील वाहनांच्या चोऱ्यांचे प्रकार वाढले आहेत. असाच प्रकार शहरातील मंजुषा लेआऊट येथे घडला. येथील रहिवासी अमोल उपगन्लावर यांच्या किराणा वस्तूंचा व्यवसाय आहे. गजानन महाराज प्रवेशद्वाराजवळ परिश्रम किराणा स्टोअर्स नावाचे दुकान आहे. या दुकानाजवळच चेतन गुंडावार यांच्या घरासमोर उपगन्लावार यांचे गोडाउन आहे. चोरट्यांनी गोडाऊनचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. आतील ६३ हजार रुपये किमतीचे प्रति १५ लिटर तेलाचे ३० पिंप, २७ हजार रुपये किमतीचे प्रती एक लिटरचे १२ पॉकेट असलेले १५ खड्ड्याचे बॉक्स आणि बिस्किटच्या दोन पेट्या, असा एकूण ९१ हजारांच्या किराणा वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या. गुंडावार यांच्या गोडाउनचा दरवाजा उघडा दिसल्याने चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. भद्रावती पोलिसात तक्रार दाखल केली असून, चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गोडाउनमधून तेलाचे पिंप, बिस्किटची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:18 IST