पालकांत समाधान : सांस्कृतिक कार्यक्रमाच्या वेळेला प्रतिबंधचंद्रपूर : बिटस्तरीय शालेय सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना वेठिस धरून रात्री उशिरापर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येत होते. यामुळे विद्यार्थ्यांना अनेकवेळा थंडीत रात्री उशिरापर्यंत कुडकुडत रहावे लागत होते. एवढेच नाही तर जंगल परिसरातील शाळांमध्ये रात्रीच्या कार्यक्रमामुळे वन्यप्राण्यांपासून धोकाही निर्माण झाला होता. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची शिक्षणाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली असून कोणत्याही परिस्थितीत रात्री १० नंतर कार्यक्रम घेऊ नये, असे सक्त आदेश दिले आहे. या आदेशाची सध्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये अंमलबजावणी होत आहे.जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने बिटसस्तरीय शालेय क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. या स्पर्धांमध्ये दिवसभर क्रीडा स्पर्धा आणि रात्री सांस्कृतिक कार्यक्रम असे नियोजन करण्यात आले होते. रात्री सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान रात्री २ ते ३ वाजेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. काही दिवसापूर्वी शिनाळा या गावात सांस्कृतिक कार्यक्रमदरम्यान विद्यार्थ्यांना थंडीत कुडकुडत ठेवण्यात आले. विशेष म्हणजे, थंडीमुळे आणि डोळ्यावर झोप असल्याने विद्यार्थ्यांच्या तोंडून शब्दही बाहेर पडत नव्हते. हा प्रकार ‘लोकमत’ ने प्रकाशित करताना सर्वस्तरातून संतप्त भावना व्यक्त केल्या गेल्या. तत्पूर्वी येथील महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देऊन जंगल परिसरातील सांस्कृतिक कार्यक्रम रात्री घेऊ नये, असे निवेदन देत लक्ष वेधले. त्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना आदेश देत कोणत्याही परिस्थितीत रात्री १० नंतर कार्यक्रम घेऊ नये, असे बजावले. (नगर प्रतिनिधी)
आता विद्यार्थी १० च्या आत घरात
By admin | Updated: January 25, 2015 23:10 IST