खडसंगी : चिमूर तालुक्यातून जून महिना पूर्ण कोरडा गेला. जुलै महिन्यात काही प्रमाणात पावसाने हजेरी लावली. सोयाबीन पेरणीच्या हंगामाला पाण्यामुळे उशीर झाल्याने ९० टक्के शेतकऱ्यांनी सोयाबिनची लागवड केली नाही. आता आॅगस्ट महिना संपायला आला तरी शेतकऱ्यांच्या शेतात पाणी नाहीे. दुसरीकडे पावसाअभावी शेतकऱ्याच्या डोळ्यात मात्र पाणी आले आहे.यंदा चिमूर तालुक्यातील खडसंगी, आमडी, बोथली, वहानगाव, सावरी, शंकरपूर, भिसी, नेरी परिसरात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने पेरण्या दडपल्या गेल्या. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. सोयाबिन पाण्याअभावी व वेळेअभावी पेरता आले नाही. मात्र धानाची रोवणी करण्याची वेळ आली आहे. काही भागात धानाचे रोपे लहान आहेत. तर काही भागात पाण्याअभावी पऱ्हे करपण्याच्या अवस्थेत आहेत. काही शेतकऱ्यांचे पऱ्हे रोवणीकरिता तयार झाले आहेत. मात्र शेतात पाणी नसल्याने रोवणी कशी करायची, हा पेच धान उत्पादक शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. चिमूर तालुक्यात सिंचनाच्या पुरेशा सोयी नसल्याने शेतकऱ्यांना निगर्सावरच अवलंबून राहावे लागते. त्यामुळे चिमूर तालुक्यात सोयाबिनची पेरणी नगण्य झाली आहे. तर कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. मात्र पावसाअभावी कपाशीचे रोपेसुद्धा करपायला लागली आहेत. त्यामुळे लावलेला कापूस होणार की नाही, या चिंतेत शेतकरी आहेत. तसेच पाण्याअभावी धानाची रोवणी वेळेवर होणार की नाही याच्याही चिंतेत चिमूर तालुक्यातील धान उत्पादक शेतकरी सापडला आहे. (वार्ताहर)
शेतात नाही; डोळ्यात पाणी...!
By admin | Updated: August 19, 2014 23:36 IST