ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या निलज ग्रामपंचायतीने सन २०१३-१४ या आर्थिक वर्षात यशवंत पंंचायत राज अभियानात सक्रीय सहभाग घेवून योजनांची उद्दीष्टपूर्ती केली. १०० टक्के ग्रामसभा भरघोस उपस्थितीने पार पाडल्या. करवसुुली, मनरेगा, मागासवर्गीय कल्याण, महिला बालकल्याण, पाणीपुरवठा व दारुबंदी लोकसहभाग इत्यादी कामांमध्ये भरीव कामगिरी केली. याची दखल घेत या ग्रामपंचायतीला केंद्र सरकारचा आठ लाखांचा तृतिय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.विभागस्तरावर या कामाची तपासणी भंडारा जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकाऱ्यांनी केली. तर राज्यस्तरीय तपासणी बुलढाणा येथील पंचायत राज प्रशिक्षण केंद्राचे प्रा. घोटेकर यांनी केली. अभियानात निलज ग्रामपंचायतीची तृतिय क्रमांकावर निवड करण्यात आली. १६ मार्चला केंद्र शासनाचे तपासणी चमूमार्फत पंचायत सशक्तीकरण अभियानाअंतर्गत तपासणी करून शासनाकडे अहवाल सादर केला. या तपासणीतसुद्धा निलज ग्रामपंचायत पात्र ठरली. नवी दिल्ली येथे विज्ञान भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सरपंच चंद्रहास चहांदे यांना प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले. आठ लाख रुपयांचा रोख पुरस्कारसुद्धा जाहीर करण्यात आला. या यशासाठी सरपंच चंद्रहास चहांदे, यांच्यासह उपसरपंच पुंडलिक ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य. ग्रामसेविकास सुशिला उके व गावकऱ्यांनी सक्रीय सहभाग घेऊन परिश्रम घेतले. विशेष बाब म्हणजे विनोद चौधरी यांच्या नेतृत्त्वात गावातील तरुण वर्ग या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. त्याचमुळे हे यश खेचून आणता आले. असे सरपंच चंद्रहास चहांदे यांनी सांगितले. या यशाबद्दल ग्रामपंचायतीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. (तालुका प्रतिनिधी)
निलज ग्रामपंचायतीला आठ लाखांचा पुरस्कार
By admin | Updated: May 15, 2015 01:07 IST