जिल्ह्यात सरासरी ७४ हजार ३०० हेक्टरवर सोयाबीनची लागवड होणार आहे. त्यापैकी आतापर्यंत ५४ हजार ५५१ हेक्टरवर (७३. ४१ टक्के) लागवड झाली. वरोरा, भद्रावती, राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी तालुक्यात यंदा सोयाबीन लागवडीचे प्रमाण अधिक आहे. हे पीक सध्या अंकुरण होऊन सुमारे २० ते २५ दिवस झाले आहेत. काही भागात पाच ते सहा इंचापेक्षा जास्त याप्रमाणे पिकांची वाढ झाल्याचे दिसून येते. २० दिवस पूर्ण झालेले अंकुरण सध्या अचानक पिवळे पडत असल्याचे निरीक्षण कृषी विभागाने नोंदविले. जिल्ह्यात साधारण: २० टक्के सोयाबीन पिकावर खोडमाशीचा प्रार्दुभाव झाल्याचे पुढे आले आहे. राजुरा, भद्रावती, वरोरा व गोंडपिपरी तालुक्यात १५ टक्के प्रादुर्भाव झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच खबरदारी घेऊन प्रतिबंधात्मक फवारणी करण्याच्या सूचना कृषी विभागाने दिल्या आहेत.
अशी ओळखा खोडमाशी
सोयाबीन पीक १५ ते २० दिवसांचे असताना पाने पिवळी पडतात. अशा शेतातील सात ते आठ झाडे उपटून खालच्या बाजूला उभा चिरा मारल्यास किडीमुळे झालेले नुकसान दिसून येते. पाने पिवळे असल्याने अन्नद्रव्याची कमतरता आहे, असे शेतकऱ्यांना वाटते. त्यानुसार उपाययोजनाही करतात. मात्र, खोडमाशीमुळे अन्नद्रव्यांचा पुरवठा थांबत असल्याने सोयाबीनची पाने पिवळी पडतात. शेतकऱ्यांनी आतापासूनच सापळे व शिफारशींच्या कीडनाशकांचा वापर करावा, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.
कपाशीवर मावा किडीची लक्षणे
जिल्ह्यात कपाशीचे सरासरी क्षेत्र १ लाख ६० हजार ६०० हेक्टर आहे. या क्षेत्रावर आतापर्यंत १०० टक्के लागवड झाली. मात्र, या पिकावर मावा किडींची लक्षणे दिसून आली आहेत. २५ हजार २१४ हेक्टरवर तूर लागवड करण्यात आली. हवामान पोषक असल्याने हे पीक सध्या बरे आहे.
पावसाअभावी पऱ्हे भरणी अडचणीत
१ लाख ७१ हजार ६०० हेक्टर क्षेत्रात यंदा भात रोवणीचे नियोजन करण्यात आले आहे. पण, भात उत्पादक तालुक्यातच पावसाचे प्रमाण कमी असल्याने १ जुलै २०२१पर्यंत केवळ १५ हजार ७८ हेक्टर क्षेत्रात (८.७ टक्के) पऱ्हे भरणीचे काम पूर्ण झाले.
पीकनिहाय पेरणी हेक्टर १ जुलैपर्यंत
भात पऱ्हे भरणी- १५,०७८
सोयाबीन- ५४,५५१
कापूस- १,६३,६९२
तूर- २५,२१४
इतर पिके- २,७७३