आयुधनिर्माणी (भ्रदावती) : चंद्रपूर- गडचिरोली जिल्ह्याकरिता गोंडवाना विद्यापीठाची निर्मिती करण्यात आली. या दोन्ही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झाडीबोलीचा वापर नागरिक करतात. या बोलीतील विपुल प्रमाणात साहित्य निर्मिती आहे. गोंडवाना विद्यापीठ निर्माण झाल्यावर तरी या बोलीला विद्यापीठीय अभ्यासक्रमात मानाचे स्थान मिळेल, अशी अपेक्षा असताना या विद्यापीठातही झाडीबोली साहित्याकडे अभ्यासमंंडळाचे दुर्लक्ष झाले आहे. मागासलेले जिल्हे अशी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांची ओळख आहे. या ना त्या कारणाने सतत मागासलेपणाची जखम काळजास बांधून जिल्ह्यातील नागरिक जगत आहे. या दोन्ही जिल्ह्यातील मागासवर्गीय बॅकलॉग दूर करण्यासाठी शासनाने गोंडवाना विद्यापीठाची निर्मिती केली. या परिसरात मोठ्या प्रमाणात झाडीबोली बोलली जाते. झाडीबोली हा या परिसरातील नागरिकांचा प्राण आहे. गोंडवाना विद्यापीठ निर्माण झाल्यानंतर विद्यापीठीय अभ्यासक्रमात मोठ्या प्रमाणात झाडीबोली साहित्याचा समावेश होईल अशी विद्यार्थी व अभ्यासकांना अपेक्षा होती. मात्र विद्यापीठ स्तरावर झाडीबोलीला आजतागायत मानाचे स्थान मिळाले नाही. त्यामुळे विद्यापीठाच्या या उदासीनतेमुळे स्थानिक अभ्यासकांत नाराजी आहे.झाडीबोलीतून निर्माण होणाऱ्या साहित्याला समाजात मानसन्मान प्राप्त होतो. सभा संमेलनांच्या माध्यमातून गोडवा वाढत असताना अनेक नवोदित साहित्यिक झाडीबोलीतून साहित्य जन्माला घालीत आहेत. कवी संमेलन, साहित्य संमेलने, कथाकथने व ग्रंथप्रदर्शनीच्या माध्यमातून हे साहित्य घराघरात पोहचलेले असताना या साहित्याने विद्यापीठाचा उंबरठाही ओलांडू नये. ज्यांच्यावर हे साहित्य साता समुद्रापार नेण्याची भिस्त आहे. त्यांचेच याकडे दुर्लक्ष होत आहे.यासंदर्भात प्रसिद्ध समीक्षक डॉ. किशोर सानप म्हणाले, झाडीबोली ही चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांची बोलीभाषा आहे. त्यामुळे याच जिल्ह्यात असलेल्या विद्यापीठाने तिला मान सन्मान द्यायलाच पाहिजे. खरे म्हणजे, पदव्युत्तर मराठी अभ्यासक्रम याच बोलीतून सुरू झाले पाहिजे. पदवी परीक्षेपर्यंत अभ्यासक्रम या बोलीतून असले पाहिजे. आदिवासींच्या भाषांचे अभ्यास करणारे स्वतंत्र अध्यासन असावे. झाडी बोलीतून लेखन करणाऱ्यांशी चर्चा करून स्वतंत्र एम.ए. (झाडीबोली) करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.विचारवंत व लेखक डॉ. यशवंत मनोहर म्हणाले , त्या त्या भागातील जी बोली असेल ती, काही प्रमाणात अभ्यासक्रमात असायला पाहिजे. याकरिता तिची टक्केवारी निर्धारीत करुन अभ्यासात असावी. विद्यार्थ्यांत याबबात आवड निर्माण करुन विविध बोलीतील उत्तम नमुने अभ्यासात असलेच पाहिजे. संपूर्ण साहित्य नव्हे पण त्यातील काही प्रमाणात ती असावी. प्रमाण भाषा कंगाल होते तेव्हा बोलीतील शब्द ती उच्चतम असते. असे असले तरी, झाडीबोली विद्यापीठातील अभ्यासक्रमात स्थान प्राप्तीसाठी उंबरठे झिजवत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे झाडीबोलीला विद्यापीठात स्थान देणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)
गोंडवाना विद्यापीठात झाडीबोली साहित्याची उपेक्षा
By admin | Updated: August 17, 2014 23:05 IST