एन.आर. कांबळे : महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेची सभाचिमूर : चिमूर पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या सहाव्या वेतन आयोगाचे हप्ते अद्यापही जमा करू शकले नाही. ही बाब खेदजनक असून त्याकडे प्रशासकीय कर्मचारी जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत. त्यासाठी संघटनेला तीव्र आंदोलन उभे करून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष वेधावे लागेल. त्यामुळे शिक्षकांना त्रास सहन करावा लागत आहे. पेन्शन केस मंजूर करण्यास दीड ते दोन वर्षे लागतात. शिक्षकांनी एकजुटीने प्रशासनाविरूद्ध लढा देण्यासाठी सज्ज असले पाहीजे, असे मत राज्य संघटक एन.आर. कांबळे यांनी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या सभेत अध्यक्षीय मार्गदर्शनात व्यक्त केले.याप्रसंगी संघटना पदाधिकारी हरिश्चंद्र कामडी, नरेंद्र मुंगले, रवी वरखेडे, ताराचंद दडमल, विजय निनावे, शिक्षक संस्थेचे अध्यक्ष ब्रह्मानंद माळवे, तालुका अध्यक्ष मधुकर दडमल, सरचिटणीस विनोद महाजन, कार्यालयीन सचिव गोविंदा गोहणे, तुकाराम उरकुडे आदी मान्यवर उपस्थित होते.एन.आर. कांबळे म्हणाले की, कर्मचारी एकमेकांकडे बोट दाखवून काम पाडून ठेवतात. अधिकाऱ्यांकडे सही करण्यासाठी फाईल नेल्या जात नाही. शिक्षक कार्यालयात आला रे आला की, त्याला जाळ्यात अडकवून अडचणीत आणतात. कार्यालयाची ही एक पद्धत आहे. तेव्हा सावध राहून शिक्षकांनी काम केले पाहिजे, असेही ते म्हणाले. सन २०१६-२०२१ या पंचवार्षिक निवडणुकीसाठी संस्थेच्या सभासदामधून मनोगत जाणून घेऊन प्रत्येक बिटातून निवडणुकीसाठी उभे राहणाऱ्यांचा विचार घेण्यात आले. संघटना जमाखर्च व शिक्षकांच्या समस्या निकाली काढण्यासाठी उचलावे लागलेले पाऊलाबाबत शिक्षकांच्या नावासह तालुका अध्यक्ष मधुकर दडमल यांनी सभेत सविस्तर माहिती दिली. संघटनेचे काम वेगाने चालू असून शिक्षकांच्या समस्या निकाली काढण्यात येत आहे. संघटनेकडे सन २०१३-२०१६ या गटवर्षातील रजा प्रवास सवलत ही समस्या शिल्लक आहे. त्यावर चिमूर पंचायत समिती कार्यालयाने समस्या निकाली काढण्यासंदर्भात सकारात्मक भूमिका घेतली आहे. अनेक शिक्षकांचे सहाव्या वेतन आयोगाचे हप्ते अजूनपर्यंत त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले नाहीत. मागील तीन महिन्यांपूर्वी समस्या निवारण सभा होती. त्यात लेखा विभागाने रक्कम जमा करण्याबाबत आश्वासन दिले होते. परंतु ते काम झाले नाही. सभेचे संचालन कार्यालयीन सचिव गोविंदा गोहणे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार बीट प्रमुख सलीम तुर्के यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)
शिक्षकांनी एकजुटीने लढा देण्याची गरज
By admin | Updated: August 26, 2016 00:57 IST