‘त्या’ तीनही नदीघाटांवरून नावेचाच प्रवास

By Admin | Updated: December 25, 2014 23:29 IST2014-12-25T23:29:09+5:302014-12-25T23:29:09+5:30

यवतमाळ जिल्ह्याच्या सीमारेषेवरुन वाहणाऱ्या पैनगंगा नदीवरच्या कोरपना तालुक्यातील तीन नदीघाटांवर अद्यापही पुलाचे निर्माण झाले नाही. त्यामुळे नागरिकांना अजूनही नावेच्या सहाय्याने

Nave travels from all the three river basins 'those' | ‘त्या’ तीनही नदीघाटांवरून नावेचाच प्रवास

‘त्या’ तीनही नदीघाटांवरून नावेचाच प्रवास

पुलांच्या निर्मितीकडे दुर्लक्ष : प्रशासन व लोकप्रतिनिधीची उदासीनता
चंद्रपूर : यवतमाळ जिल्ह्याच्या सीमारेषेवरुन वाहणाऱ्या पैनगंगा नदीवरच्या कोरपना तालुक्यातील तीन नदीघाटांवर अद्यापही पुलाचे निर्माण झाले नाही. त्यामुळे नागरिकांना अजूनही नावेच्या सहाय्याने किंवा पायदळच नदीपात्रातूनच प्रवास करावा लागत आहे. नदीपात्र खोलगट असल्याने हा प्रवास धोक्याचा आहे. मात्र कमी अंतराच्या फेऱ्यामुळे सारे धोके प्रवाशी पत्कारताना दिसून येत आहे.
कोरपना तालुक्यातील परसोडा, पारडी, गांधीनगर हे अनुक्रमे तीन नदीघाट आहे. येथून प्रवाशांची नियमित ये- जा सुरू असते. या तिन्ही घाटांवर पूल निर्मिती होण्याची नितांत गरज आहे. हे मार्ग कोरपना व मुकूटबन शहराला जोडणारे कमी अंतराचे असल्याने नियमित रेलचेल असते. शिवाय कोरपना, वणी, झरी (जामणी) व तेलंगणातील बेला मंडल परिसरातील नागरिकांना रहदारीच्या दृष्टीकोनातून अत्यंत सोयीचे आहे. परंतु या नदीघाटावर स्वातंत्र्यानंतर अनेक दशके लोटूनही व वारंवार मागणीे होऊनही पुल निर्मिती होऊ शकली नाही. त्यामुळे या घाटावरुन जीवघेणा प्रवास नागरिकांना करावा लागत आहे. यातील पारडी (खातेरा) नदीघाटावर पुल निर्मितीसाठी शासनातर्फे सत्कारत्मक पावले उचलली गेली. पुलांच्या निर्मिती कार्यालाही मंजुरी देण्यात आली. परंतु राजकीय वरदहस्तापुढे चक्क पुलच पळवून नेण्याचा प्रकार घडला. येथील निर्माणधीन पूल झरी (जामणी) तालुक्यातील दिग्रस येथून तेलंगणामधील जैतन मंडलच्या अनंतपूर नदीघाटाला जोडला गेला. या पुलांची निर्मिती होऊन नियमित रहदारीही सुरू झाली. शासन दरबारी आजपर्यंत या ठिकाणी दुसऱ्या पुलांच्या निर्मितीचा आराखडा अद्यापही तयार केला नसल्याने पुलांच्या निर्मितीचे भवितव्य अंधारीतच आहे. यापूर्वी याच पैनगंगा नदीवर कोडशी (खुर्द), वनोजा येथे पुलांची निर्मिती करण्यात आली. यातील वनोजा पूल पाण्यात वाहून गेल्याने पुन्हा निर्मिती करण्यात आली. परंतु यातील एकाही पुलांचा अनुशेष अद्यापही दूर होऊ शकला नाही. वाहतुकीच्या दृष्टीने कोरपना- वणी, गडचांदूर- वणी मार्ग सुलभ झाले असले तरी, तीन पुलांचा अनुशेष बाकीच आहे. याबरोबरच तेलगंणा- महाराष्ट्राला जोडणाऱ्या दुर्भा- सांगडी, भेदोडा- धानोरा, खोगदूर- हिरापूर या पुलांचाही अनुशेष पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे तेलंगणातील आदिलाबाद व यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांना याच नवनिर्मित दिग्रस पुलाचा एकमेव मार्ग वाहतुकीच्या दृष्टीने सोयीचा आहे. परंतु अंतराच्या दृष्टीने हा मार्ग जिल्ह्यातील नागरिकांना परवडणारा नाही.
पारडी येथे पुलाची निर्मिती झाल्यास पारडी, रुपापेठ, मेहंदी, अकोला व नदीपलीकडील खातेरा, खडकी, आयलोन, अडेगाव आदी गावासाठी सोयीचे होईल. परसोडा घाटावर केल्यास परसोडा, परसोडा गुडा, कोठोडा, दुर्गाडी, पांडूगुडा, नदीपलीकडील पिंपरड, राजूर, बैलनपूर, हिरापूर, मांगली व तेलगंणातील कोब्बई भागातील गावातील नागरिकांना त्याचा फायदा होईल. गांधीनगर येथे पूल झाल्यास कोडशी (बु.), कोडशी (खु.), हेटी, तुळशी, शिवाजीनगर, गांंधीनगर, जेवरा, नदीपलीकडील तेजापूर, चिखली, देऊरवाडा, आमलोन आदी गावासाठी रहदारी व व्यापारपेठांच्या दृष्टीने सोयीचे होईल. कोरपना व मुकूटबन या शहरातील बाजारपेठेला यामुळे सुगीचे दिवस येऊ शकतात. दोन्ही भागात भाजपाचेच लोकप्रतिनिधी असल्याने नव्या सरकारकडून आता नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहे, हे विशेष. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Nave travels from all the three river basins 'those'