मोहाळी (नलेश्वर) : पुनर्वसित जामसाळा येथील रस्ता पुर्ण करण्यासाठी जमिनीची मोजणी करण्याकरिता गेलेल्या नायब तहसीलदारांना धक्काबुक्की व मारहाण करण्यात आली. जुना जामसाळा व जामसाळा या दोन गावामध्ये संघर्ष पेटल्याने पुनर्वसित जामसाळा गावाला आता पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अशा परिस्थितीत उद्या सोमवारी मोजणी होणार आहे.३५ वर्षांपासून अपूर्ण असलेला रस्ता पूर्ण करण्यात यावा म्हणून पुनर्वसित जामसाळावासीयांची सातत्याने मागणी होती. मात्र जुन्या गावातील शेतकऱ्यांची शेतजमीन या रस्त्यात जात असल्याने त्यांनी विरोध दर्शविला. हा रस्त्याचा वाद ३५ वर्षापासूनचा आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये या अपूर्ण रस्त्याची मोजणी करून रस्ता पुर्ण करण्याचे आदेश तहसीलदार सिंदेवाही यांना देण्यात आले. १२ जूनला सकाळी १० वाजता नायब तहसीलदार रामचंद्र नैताम व भूमापन अधिकारी जागेची मोजणी करीत असताना दोन गावात रस्त्याच्या जागेसाठी संघर्ष पेटला. यात नायब तहसीलदार यांना धक्काबुक्की करून मारहाण करण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तहसीलदार कुवर व ठाणेदार परघने यांनी घटनास्थळी धाव घेतली. संघर्ष आणखी विकोपाला जावू लागला. त्यामुळे पाथरी, मूल व चंद्रपूर येथून दंगा नियंत्रण पथकाला बोलविण्यात आले. उपविभागीय अधिकारी संगिता राठोड घटनास्थळी दाखल झाल्या. पुन्हा मोजणी सुरू झाली. मात्र जुना जामसाळावासीयांनी विरोध दर्शविल्याने त्यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले. उद्या १५ जूनला पोलीस बंदोबस्तात जागेची मोजणी होत असून गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आलेले आहे. (वार्ताहर)
जामसाळ्याला पोलीस छावणीचे स्वरूप
By admin | Updated: June 15, 2015 01:08 IST