विनेशचंद्र मांडवकर नंदोरीनंदोरी हे एक बऱ्यापैकी खेडे. या मातीतील अनेक व्यक्ती आपल्या कर्तृत्वातून नामवंत झाले आहेत. हा या गावाचा अभिमानच. भद्रावती पंचायत समितीचे माजी सभापती रमेश लांबट यांची सुपुत्री जयश्री रमेश लांबट हिनेही गावाची ही परंपरा कायम राखली आहे. स्त्री असतानाही अगदी सीमा सुरक्षा दलात जाऊन बांगला सीमेवर शत्रूंशी लढा देत आहे. तिच्या या देशसेवा नंदोरीलाही नावलौकिक मिळवून दिले आहे. जयश्री लांबट हिचा स्वभाव बालपणापासूनच मनमिळावू. तिला मैत्रिणीही असंख्य. मैत्रिणीसोबतच खेळायची, अभ्यासही करायची. परंतु इतरांपेक्षा वेगळे करण्याची जिज्ञासा तिच्या मनात नेहमीच होती. सोबत देशसेवेचेही आवड. स्त्री असल्यामुळे आपली ही आवड पूर्ण होईल का, असा विचार तिच्या मनात कधीच आला नाही. अनेक तरुण सैन्यात संरक्षण खात्यात सेवा देतात, म्हणूनच आपण निवांत झोपू शकतो, हे तिला ठाऊक होते. सीमा सुरक्षा दलात जाण्याचा ध्यास जयश्रीने घेतला. स्त्री ही शक्तीस्वरूप असल्याचा प्रत्यय देत थेट बीएसएफ (बार्डर सिक्युरीटी फोर्स) तिने नोकरी पत्करली. सैन्यभरती प्रक्रियेवर अवघड चाचण्या, व्यायाम, सराव, अभ्यास यात केवळ जिज्ञासेपोटी स्वत:स झोकून द्यायची. आई-वडिलांनी व भावडांनी सैन्यात जाण्यास सुरुवातीस विरोध केला. परंतु देशसेवाच करायची, असे या विरकन्येने ठरविले होते. जिवापाड प्रेम करणाऱ्या आईवडिलांना व भावडांना समजावत तिने निर्णय घेतला व अथक परिश्रमाने सराव करीत सर्व चाचण्या यशस्वीरित्या तिने पूर्ण केल्या. अवघ्या २२ व्या वर्षी जयश्री सीमा सुरक्षा दलात दाखल झाली. सोबतच जयश्रीने आपले उच्च शिक्षणही पूर्ण केले.आज जयश्री आगरतला फटीचरा-रायमोर येथे आसाम प्रातांत तैनात आहे. नुकतीच धाकट्या बहिणीच्या विवाहाकरिता नंदोरी येथे स्वगावी आली. यावेळी प्रस्तुत प्रतिनिधीने तिची भेट घेत बोलते केले. सैन्यात जाण्याची प्रेरणा कशी मिळाली, या प्रश्नावर जयश्री म्हणाली, ‘शहीद योगेश डाहुले’ यांच्या बलिदानाने आपल्याला ही प्रेरणा मिळाली. ती म्हणते केवळ तरुणांनीच देशसेवेत स्वत:ला धोकून द्यायचे का ? तरुणींनी यात समोर आले पाहिजे. ‘ तु जमीन कर, आसमान कर, अपने जिंदगी का नया इतिहास कर, खुद जिंदगी तेरे सामने है, हर एक कदम पर विश्वास कर’ हे काव्य तिला बळ देत असल्याचेही तिने आवर्जुन सांगितले. कुठलेही काम मनावर घेतले तर मुली ते काम करून दाखवितातच. कोणतेही काम करताना अंगी जिद्द असावी, असेही ती म्हणते. सीमेवरील अनुभव सांगताना जयश्री म्हणाली, आपल्याला त्रिपुरामध्ये नलकट्टा येथे प्रारंभी खूप त्रास झाला. मलेरियाची साथ, डासांचा प्रचंड प्रादुर्भाव, अवजड राईफल, अवजारे, सतत युनिफार्म, जंगल, जाडजुड बुट, तेव्हा आपले घर, गाव आठवायचे. परंतु देशाकरिता आपणाला काहीतरी करण्याची संधी मिळाली याची नंतर जाणीव व्हायची आणि पुन्हा देशसेवा करताना नवा उत्साह यायचा. जयश्रीने उच्च शिक्षणही घेतले आहे. परंतु तिला इतरत्र कुठेही नोकरी करायची नाही. जयश्रीला शाळा कॉलेजातील ते मुक्त जीवन आठवते. परंतु आज आपण एका नियमांच्या चाकोरीत कर्तव्य बंधनात बांधलो आहोत, याचीही तिला जाणीव आहे. किरण बेदी, पंजाबच्या मुख्यमंत्र्याचे आपल्याला मार्गदर्शन मिळाल्याचे ती सांगते. त्यांच्या मार्गदर्शनाने आपणास नवी स्फूर्ती मिळाल्याचेही तिने लोकमतशी बोलताना सांगितले.‘जीवनात निदान एक काम असे करा, ज्याने तुमचे स्मरण हे जग पुन्हा पुन्हा करेल’ असा संदेशही जयश्रीने दिला आहे.
नंदोरीची वीरकन्या लढतेयं बांगला सीमेवर
By admin | Updated: May 11, 2015 01:01 IST