कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या निदानासाठी आरोग्य विभागाकडून २१ एप्रिलपर्यंत १८ हजार २४० व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत १ हजार ५९७ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. मात्र, १७ हजार ९४४ व्यक्ती कोरोनामुक्तही झाले आहेत, तर २९६ व्यक्तींवर उपचार सुरू आहेत. तालुक्यात ८ व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
नागभीड तालुक्यात ३ जून २०२० रोजी एकाच दिवशी कोरोनाचे ५ रुग्ण आढळून आल्याने सबंध तालुक्यात चांगलीच खळबळ माजली होती. या आजाराला पायबंद घालण्यासाठी प्रशासनाने वेळीच उपाययोजना केल्या; पण हा आजार वाढतच आहे. मात्र, हा आजार पसरू नये यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. या उपाययोजनांचाच एक भाग म्हणून येथील आरोग्य विभागाकडून विविध घटकांतील व्यक्तींची अँटिजन तपासणी सुरू असून, तालुक्यात आतापर्यंत ९ हजार ५१६ व्यक्तींची अँटिजन तपासणी करण्यात आली आहे, तर ८ हजार ७२४ व्यक्तींची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. विनोद मडावी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.