चिमूर : उपविभागीय अधिकारी संगीता राठोड यांच्या दबंगगिरीने तहसील कार्यालयातील महसूल कर्मचारी त्रस्त झाले असताना संघटनेच्यावतीने ६ जूनला कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले असले तरी मात्र लेखणी सुरू ठेवण्यात आली.उपविभागीय अधिकारी यांनी कर्मचाऱ्यांना कोणतीही कारणे दाखवा नोटीस न देता निलंबीत करण्याचा इशारा दिल्याने कनिष्ठ कर्मचारी मात्र मानसिक दडपणात वावरत होते. उपविभागीय अधिकाऱ्यांच्या असभ्य वागणुकीच्या निषेधार्थ काम बंद ठेवण्याचा कर्मचाऱ्यांनी निवेदनातून इशारा दिला होता. परंतु हे निवेदन आठ दिवसांपूर्वी देण्याची गरज होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी काम बंद न करता काळ्या फिती लाऊन काम केले. या आंदोलनात महसूल कर्मचारी संघटनेचे वाय.वाय. मदनकर, सी.के. हिंगणेकर, एस.डी. विखार, एस.आर. पिपरे, बी.आर. नंदागवळी, एस.बी. बडगाये, एन.एस. बोधे, आर.के. राठोड, ए.बी. शेंडे, आर.डी. चिडे, पी.डी. शेंडे, ए.डी. यादव, शंकर मेश्राम, एन. मेश्राम सहीत आदी कर्मचाऱ्यांनी सहभाग दर्शविला. या आंदोलनानंतर आता उपविभागीय अधिकारी संगीता राठोड यांच्यावर काय कारवाई केली जाते, याकडे महसूल कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)
महसूल कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन
By admin | Updated: June 7, 2015 01:14 IST