अनेकांनी घेतला धसका : समायोजनाची प्रक्रिया अवघडतळोधी (बा.) : चंद्रपूर जिल्ह्यातील खाजगी माध्यमिक शाळात कार्यरत हजाराहून अधिक कर्मचारी अतिरिक्त होणार असल्याची माहिती सहविचार सभेमध्ये समोर आली आहे. यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी धसका घेतला आहे. विशेष म्हणजे,ज्या शिक्षकांचा तीन वर्र्षांचा सेवाकाळ पूर्ण झाला नाही. त्यांचे मोठे नुकसान होणार असल्याचे समजते.महाराष्ट्र राज्यशिक्षण परिषद (ग्रामीण व शहरी) जिल्हा चंद्रपूरच्या वतीने शिक्षक आमदार नागो गाणार यांच्या उपस्थितीत शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या कार्यालयात सहविचार सभा पार पडली. शिक्षण विभागाच्या आदेशानुसार ३१ जुलै २०१४ ला सत्र २०१३-१४ च्या पटसंख्येनुसार संच मान्यता जाहीर करण्यात आली आहे. सदर संच मान्यतेनुसार खाजगी माध्यमिक शाळांतील ३३२ शिक्षक तर, ८३० चतुर्थ श्रेणी कर्मचारी अतिरिक्त होणार आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ठरविताना आरटीईच्या कायद्याप्रमाणे शासनाने ज्या शाळेत ५ ते १० चे वर्ग असतील त्या शाळेत ५ वा वर्ग स्वतंत्र, वर्ग ६ ते ८ वर्गाकरिता नवीन आकृतीबंध लागू केला असून विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार शिक्षकांची नेमणूक करावी, असे आदेशात म्हटले आहे. यानुसार ३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक अशी संख्या निर्धारित केली असून केवळ वर्ग ९ व १२ करीता मात्र वर्ग निहाय शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग नेमण्यात येणार आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत शिक्षक अतिरिक्त होणार असून त्यांचे समायोजन रिक्त जागेवर करण्यात यावे असे निर्देश देण्यात आले आहे. ज्या शिक्षण सेवकांची तीन वर्षे सेवा पूर्ण झाली नसेल त्यांची नोकरी संपुष्टात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांवर नोकरीतून बाद होण्याची वेळ आली आहे. (वार्ताहर)
एक हजाराहून अधिक कर्मचारी होणार अतिरिक्त
By admin | Updated: August 13, 2014 23:47 IST