चंद्रपूर : ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ असे ब्रिद असलेल्या पोलिसांना सदैव नागरिकांच्या रक्षणासाठी तत्पर राहावे लागते. मात्र मागील काही दिवसांपासून पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मोबाईल फोन डोखेदुखी ठरत आहे. अनेकवेळा मनस्तापजनक घटना घडत असल्याने पोलीस कर्मचारी सध्या मोबाईलमुळे जाम त्रस्त झाले आहे.नागरिकांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर राहील, अशी शपथत् पोलीस विभागात दाखल होताना प्रत्येक पोलीस कर्मचारी घेत असतो. मात्र त्यानंतरही कौटूंबिक जबाबदाऱ्याही पार पाडाव्या लागतात. सतत मानसिक ताणावात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कोणतीही युनियन किंवा पोलीस संघटन नाही. त्यामुळे दिवसेंदिवस त्यांच्या समस्या वाढत आहे. गृहमंत्रालय केवळ आश्वासने देवून त्यांचे बोळवण करीत आहे.आता मात्र या कर्मचाऱ्यांना नव्याच समस्येने ग्रासले आहे. मोबाईल फोन जेवढा चांगला ठरत आहे तेवढाच या कर्मचाऱ्यांसाठी त्रासदायक झाला आहे. विशेष म्हणजे, शासनाने पोलीस कर्मचाऱ्यांना मोबाईल सेवा पुरविली नाही. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या खासगी मोबाईलवर अनेकवेळा अधिकारी फोन करून बोलावतात. एवढेच नाही तर, त्यांना काही वेळा पोलीसी भाषेत शिविगाळही केली जाते. मात्र मुकाट्याने ऐकल्याशिवाय या पोलीस कर्मचाऱ्यांना इलाज नाही.सदैव तत्पर असलेले पोलीस सुख, दु:खाच्या प्रसंगी आपला मोबाईल बंद ठेवत असेल तर, अशावेळीही त्यांना बोलावून चांगलेच खडसावल्या जात असल्याचा प्रकार अलिकडे वाढला आहे. एखादा पोलीस कर्मचारी सुटीवर असेल किंवा अंत्ययात्रेत सहभागी झाला असेल अशाही वेळी पोलीस अधिकारी त्याला बोलावतात. यामुळे मात्र त्यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. किमान शासनाने शासकीय मोबाईल तसेच बील देवून दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
मोबाईल ठरत आहे पोलिसांसाठी डोकेदुखी
By admin | Updated: September 25, 2014 23:20 IST