कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांना झोपू दिले नाही : रात्रभर जागून केले आंदोलन
चंद्रपूर : भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील घटनेनंतर संपूर्ण देश हादरला; मात्र अद्यापही प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली नाही. भंडारा येथील कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य योग्य प्रकारे बजावले असते तर ही घटना घडली नसती, असा आरोप करून चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील झोपी गेलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी मनसेच्या वतीने ‘जागता पहारा’ आंदोलन करण्यात आले.
रात्रपाळीतील कर्तव्य बजावणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना त्यांचे कर्तव्य रात्रपाळीत जागून बजावायचे असते. याची जाणीव आरोग्य कर्मचाऱ्यांना करून देण्यासाठी तसेच रात्रपाळीत झोपी जाणाऱ्या आरोग्य व्यवस्थेला जागे करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना चंद्रपूरच्या वतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बेबी केअर युनिटबाहेर मनसे पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी रात्रभर जागरण करीत जागता पहारा आंदोलन केले.
आंदोलनादरम्यान बेबी केअर युनिटच्या डॉक्टरांशी संवाद साधला. रात्रपाळीत कर्तव्य बजावत असताना कोणीही झोपू नये, जेणेकरून भंडारासारखी दुर्दैवी दुर्घटना घडणार नाही आणि आपत्कालीन परिस्थितीत लवकरात लवकर उपाययोजना करता येतील, असे मनसे नगरसेवक सचिन भोयर यांनी त्यांना सांगितले.
या वेळी भंडारा शासकीय रुग्णालयात मृत्यू पावलेल्या १० नवजात बालकांना मनसेतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. अग्निकांडास जबाबदार असणाऱ्या दोषींचा निषेध करण्यात आला. रात्रभर पहारा देत कोणत्याही आरोग्य कर्मचाऱ्याला कर्तव्यावर असताना झोपू दिले नाही.
या वेळी नगरसेवक सचिन भोयर, महिला जिल्हाध्यक्ष सुनीता गायकवाड, जनहित व विधि कक्ष जिल्हाध्यक्ष राजू बघेल, शहर उपाध्यक्ष महेश वासलवार, मनविसे शहराध्यक्ष नितेश जुमडे, डॉक्टर आशिष वांढरे, प्राध्यापक नितीन भोयर, संजय फरदे, पीयूष दुपे, चिरंजीव पॉल, अशोक मुग्धा, स्वप्निल चहारे, धनंजय उईके, समीर शेख, विनय थेटे, तुषार राणा, आशिष भुसारी, अंकुश वाटेकर, अंकित मिसाळ, साहिल राऊत आणि मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.