नागभीड : चिमूर नगर परिषदेचा मार्ग अखेर मोकळा झाला. पण त्याच विधानसभा क्षेत्रात असलेल्या नागभीडचे काय, असा सवाल येथे उपस्थित केला जात आहे. वास्तविक नागभीड नगरपरिषदेची मागणी चिमूरच्या समकालीनच आहे. राज्याचे तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण चिमूर येथे एका कार्यक्रमासाठी आले असता, त्याच कार्यक्रमात त्यांनी चिमूर आणि नागभीड येथे नगर परिषदेच्या स्थापनेची घोषणा केली होती. त्यानंतर चिमूर सारखेच येथील प्रशासन कामाला लागले होते. आवश्यक सोपस्कार प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आले होते.दरम्यान राज्यात सत्तांतर झाले. सत्तांतरासोबतच येथील आमदारही बदलले. किर्तीकुमार भांगडिया येथील आमदार झाले. ते चिमूरसारखाच नागभीडला सुद्धा न्याय देतील, असे अपेक्षित असताना त्यांनी चिमूरला प्राधान्यक्रम देवून नागभीडकरांची घोर निराशा केली आहे, असे म्हटले तरी ती अतिशयोक्ती ठरणार नाही.नागभीड नगर परिषद स्थापनेतील प्रमुख अडसर म्हणजे येथील लोकसंख्या. लोकसंख्येच्या निकषात नागभीड बसत नाही हे जरी खरे असले तरी चिमूरच्या पुर्ततेसाठी जशी आजूबाजूची गावे समाविष्ट करण्यात आली तशीच नागभीडबद्दल करता आले असते. नागभीडच्या आजुबाजूला पाच-सहा किलोमीटर अंतरावर अनेक गावे आहेत. या ागवांना नागभीड नगर परिषदेत समाविष्ट करून चिमूर सारखाच न्याय देता आला असता.वास्तविक नागभीड हे शहर चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्या मध्यवर्ती आहे. येथे रेल्वेचे जंक्शनही आहे. पण विकासाच्या बाबतीत मात्र कोसो दूर आहे. निदान नगर परिषदेच्या रुपाने नागभीडच्या विकासात काही भर पडेल या अपेक्षित नागभीडकर आहेत. (तालुका प्रतिनिधी)
आमदार साहेब, नागभीडकडेही थोडे लक्ष असू द्या...!
By admin | Updated: April 19, 2015 01:16 IST