मजूर संस्थेच्या नावावर लाखोंचा गैरव्यवहार

By Admin | Updated: March 10, 2016 01:22 IST2016-03-10T01:22:27+5:302016-03-10T01:22:27+5:30

अंग मेहनतीने काम करणाऱ्या कुशल व अकुशल मजूर कामगार यांची आर्थिक स्थिती सुधारण्याकरिता

Millions of fraud in the name of laborer organization | मजूर संस्थेच्या नावावर लाखोंचा गैरव्यवहार

मजूर संस्थेच्या नावावर लाखोंचा गैरव्यवहार

देवाडा खुर्द येथील प्रकार : बोगस प्रकरणावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न
पोंभुर्णा : अंग मेहनतीने काम करणाऱ्या कुशल व अकुशल मजूर कामगार यांची आर्थिक स्थिती सुधारण्याकरिता आणि मजूर सहकारी संस्थेमार्फत सभासदांना रोजगार देऊन त्यांची आर्थिक परिस्थिती उंचावण्याकरीता शासनाने ग्रामीण स्तरावर मजूर सहकारी संस्थाची निर्मिती केली. परंतु, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उदासीन व भ्रष्ट कारभारामुळे या चांगल्या उद्देशाला हरताळ फासल्याचा प्रकार देवाडा खुर्द येथील साईकृपा मजूर सहकारी संस्थेच्या बोगस कारभारातून चव्हाट्यावर आला आहे.
पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द येथे २१ फेब्रुवारी २०११ रोजी साईकृपा मजुर सहकारी संस्था स्थापन करण्यात आली. यामध्ये संस्थेची स्थापना करण्याविषयीची प्रथम सभा ५ नोव्हेंबर २००९ रोजी घेण्यात आली. या सभेला तक्रारकर्ते सभासद कोणीही उपस्थित नव्हते. तरीसुद्धा पोंभुर्णा येथील सहाय्यक निबंधक कार्यालयातील तत्कालीन कनिष्ठ लिपीक एस.आर. खांडरे यांनी सभा पार पडली. सभेला आपण मार्गदर्शन केल्याचे आपल्या स्वाक्षरीचे पत्र वरिष्ठांकडे पाठविले.
सभासद नोंदणी केलेल्या सभासदांना याविषयी कुठलीच माहिती नाही, ते कनिष्ठ लिपीक खांडरे यांना ओळखत सुद्धा नाही तरीही त्यांनी आर्थिक व्यवहार करून यातील काही सभासदांना हाताशी धरून बोगस मजुर सहकारी संस्था नोंदणी करून देण्यात हस्तक्षेप केला आणि आपल्या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल केली.
तसेच या ठिकाणी सहाय्यक निबंधक असलेले पुर्वीचे पी. एस. धोटे यांनी सुद्धा या प्रकरणाची कुठलीही शहानिशा न करता नोंदणीचे प्रमाणपत्र दिले. त्यामुळे ते सुद्धा तेवढेच दोषी असल्याचे समजते.
धोटे यांच्यानंतर सद्यस्थितीत सहाय्यक निबंधक म्हणून कार्यरत असलेले सी. एच. उघडे यांनी सुद्धा वार्षीक आमसभेमध्ये कुठलीच चौकशी न करता खुर्चीवर बसूनच सभेचे वृत्तांत पाठविले काय, असा प्रश्न अन्यायग्रस्त सभासदानी केला आहे. एकंदरीत बोगस संस्थेची नोंदणी करून शासनाच्या लाखो रुपयाच्या निधीची वाट लावण्यात खांडरे, धोटे, उघडे हे दोषी असून बोगस संस्थाचालक पी.के. बुरांडे, रूमाजी बुरांडे, एस. सी. नैताम, धनराज कोहळे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी तसेच संबंधीत प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी अन्यायग्रस्त सभासदांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Millions of fraud in the name of laborer organization