जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आढावा बैठक : कामे पूर्ण करण्याचे निर्देश चंद्रपूर : चंद्रपूर येथील बहुप्रतिक्षीत वैद्यकीय महाविद्यालयाचा १ सप्टेंबरला श्रीगणेशा होणार आहे. महाविद्यालयासाठी लागणाऱ्या सोईसुविधांची कामे २८ आॅगष्ट पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या असून वैद्यकीय महाविद्यालयाची आढावा बैठक गुरूवारी पार पडली. बैठकीला वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉ. प्रदिप दिक्षीत, अधिक्षक अभियंता डी. के. बालपांडे, कार्यकारी अभियंता मनोज जयस्वाल, महानगरपालिकेचे शहर अभियंता महेश बारई, इंडियन मेडीकल असोशिएशनचे राज्य उपाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, डॉ.खान, डॉ. अनंत हजारे, उपअभियंता मकवाने तसेच इतर विभागाचे अधिकारी व कत्रांटदार उपस्थित होते.पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था ५ आॅगस्टपर्यंत महानगरपालिकेने करावी, महाविद्यालय इमारत, वस्तीगृह व अधिकारी-कर्मचाऱ्यांची निवास्थाने, येथील विद्युतीकरण १५ आॅगष्टपर्यंत पूर्ण करण्यात यावे, प्रवेशासाठी नोडल अधिकारी नेमावा, सत्र सुरु होण्याच्या दोन दिवस अगोदर सर्व फर्नीचरची व्यवस्था करण्यात यावी व फायर आॅडीट तत्काळ करुन घ्यावे, अशा सूचना संबंधितांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.वैद्यकीय महाविद्यालय संबंधीच्या विषयासाठी प्रत्येक सोमवारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात कामाचा प्रगती आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. प्राधान्याने करावयाच्या कामाची यादी तयार करावी, नवीन वस्तीगृहाचा आराखडा तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. (स्थानिक प्रतिनिधी)विदर्भातील ६० विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेशएमसीआयच्या धोरणानुसार चंद्रपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात विदर्भातील ६० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश क्षमता १०० इतकी असून उर्वरीत विद्यार्थी हे इतर ठिकाणचे राहणार आहेत. या महाविद्यालयामुळे चंद्रपूर, गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण आता सोपे जाणार आहे.
मेडिकल कॉलेजचा १ सप्टेंबरला श्रीगणेशा
By admin | Updated: July 31, 2015 01:16 IST