सिंदेवाही : बळीराजा शेतात घाम गाळून राबराब राबतो. अनेक प्रकारचे महागडे बी-बियाणे पेरून शेतमाल उत्पादित करतात. परंतु मागणी व चांगला भाव न मिळाल्याने तो माल शेतकरी खुल्या बाजारात किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीत नाईलाजास्तव विकतो. मात्र बाजार समितीकडून त्या मालावर अडत वसुली केली जाते. मात्र आता अडत रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबणार आहे. राज्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समितीचे आर्थिक उत्पन्न वाढावे, यासाठी शेतकऱ्यांच्या शेतमालावर अडत वसुली करण्यात येते. त्यामुळे अनेकदा अडतच्या नावावर शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत होती. त्यामुळे ही अडत रद्द करावी, अशी मागणी करण्यात येत होती. परिणामी एक समिती तयार करण्यात आली. त्या समितीने हा अहवाल नुकताच शासनाला सादर केला असून आता समितीसोबत शेतकऱ्यांचे लक्ष शासनाच्या निर्णयाकडे लागले आहे. बाजार समित्यामध्ये शेतकऱ्यांनी विक्रीला आणलेल्या मालावर शेकडा टक्केवारीने अडत वसूल करण्यात येते. त्यात तोलाई, चाळण, हमाली, भाडे विक्री केलेल्या मालाच्या रक्कमेतून वसुल केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते. त्यामुळे शेतकरी याबाबत अनेकदा तक्रारी करीत होते, हे येथे उल्लेखनीय. (शहर प्रतिनिधी)
बाजार समितीमधून होणार ‘अडत’ हद्दपार
By admin | Updated: September 14, 2015 00:50 IST