चिमूर : नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांनंतर सर्व काही सुरळीत होईल, असे वाटत असतानाच, आता सरपंच पदाच्या बाबतीत नवा पेच निर्माण झाला आहे. तालुक्यातील काही ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षण जाहीर झाल्यानंतर, आता वेगळीच समस्या निर्माण झाली आहे. सरपंचपदाचे आरक्षण असलेला प्रवर्ग आणि निवडून आलेले उमेदवार यांचे प्रवर्ग वेगवेगळे असल्यामुळे आता सरपंचपदी कोण विराजमान होणार, याची चिंता नवनियुक्त सदस्यांना लागली आहे.
चिमूर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. यात सातारा, वाकरला, कोलारी, नवतला व साठगाव येथील सरपंच पदाचे आरक्षण अनुक्रमे अनुसूचित जाती सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व अनुसूचित जाती महिला, असे पडले आहे. मात्र, या प्रवर्गासाठी प्रभाग आरक्षणात एकही जागा नव्हती. त्यामुळे विजयी उमेदवारात या प्रवर्गातील एकही महिला व पुरुष सदस्य नाही. त्यामुळे आता शासन येथील सरपंचपदाचे आरक्षण बदलणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, सरपंच पद रिक्त राहील. यामुळे गावाच्या विकासावर विपरित परिणाम होऊ नये, यासाठी येथील सरपंचपदाचे आरक्षण बदलण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. याबाबत शासन स्तरावर अधिकृत निर्णयाची प्रतीक्षा ग्रामस्थांना लागून राहिली आहे.
नवतळा ग्रामपंचायतमध्ये विजयी उमेदवारात सर्वसाधारण, सर्वसाधारण स्त्री, नागरिकांचा मागास प्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, अनुसूचित जमाती या प्रवर्गातील उमेदवार आहेत. यातील बहुतांश उमेदवारांना आपल्याच प्रवर्गातील आरक्षण पडेल, अशी अपेक्षा होती. मात्र, आरक्षण सोडत झाल्यानंतर या सर्वांचीच निराशा झाली. अनुसूचित जाती स्त्री प्रवर्गातील उमेदवारच नसल्याने आता सरपंचपद रिक्त राहणार आहे. उपसरपंचपदाची निवडही सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली बोलविलेल्या विशेष बैठकीत केली जाते. यामुळे आता उपसरपंच निवड कशी होणार, याबाबतही उत्सुकता आहे.
प्रशासनाने सरपंच निवडीचे निकष लावून उपसरपंच निवड तरी तातडीने घ्यावी आणि सरपंचपदाचा कारभार उपसरपंचांकडे सोपवावा, असा एक मतप्रवाह नवतला येथे सुरू झाला आहे. यामुळे आता सरपंच आरक्षण बदलणार की, उपसरपंच कार्यभार पाहणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.