राजू गेडाम ल्ल मूलनगर परिषद मूल येथील मालमत्ता विभागात फेरफार करण्यासंदर्भात अनेक प्रकरणे धूळखात पडली असून फेरफार केल्यामुळे नगर परिषदेचे उत्पन्न वाढू शकते. मात्र स्वत:चे उत्पन्न वाढविण्यासाठी नागरिकांना वेठीस धरले जात असल्याचा प्रकार दिसून येत आहे. हिच स्थिती नवीन बांधकाम परवानगीबाबतसुद्धा दिसून येत आहे. मुख्याधिकारी व संबंधित लिपिकांमध्ये समन्वयकाचा अभाव असल्याने एकमेकांवर चालढकल करून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. सत्तारूढ भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचेही याकडे दुर्लक्ष होत आहे.नगर परिषदेचे उत्पन्न वाढावे, यासाठी फेरफार व नवीन बांधकामाची परवानगी प्रकरणाचा निपटारा त्वरित करणे आवश्यक असताना मात्र याकडे न.प.प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. नगर परिषदेत लिपिकाकडे गेल्यास साहेबांशी बोलून सांगतो, असे सांगितले जाते. मुख्याधिकारी यांच्याकडे गेल्यावर संबंधित लिपीक फाईल आणीत नाही तर मी काय करू, असे मुख्याधिकारी सांगतात. तसेच लिपीक असेल तर मुख्याधिकारी नाही, मुख्याधिकारी असेल तर लिपिक नाही, अशी स्थिती वारंवार होत असते. नागरिक फेरफार प्रकरणाचा निपटारा होण्यास प्रयत्न करतात, मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे एकमेकांकडे बोट दाखविण्यात व वेळ मारून नेण्याचा प्रकार सुरू आहे. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून फेरफारची प्रकरणे धुळखात पडली आहेत. फेरफार व्हावा, यासाठी वेळोवेळी नगर परिषदेत येरझारा मारताना नागरिक दिसतात. मात्र रिकाम्या हाताने प्रत्येक वेळी परत जावे लागत आहे. हा नागरिकांना त्रास देण्याचा प्रकार असल्याचे बोलले जात आहे.नगर परिषदेत भाजपाप्रणीत सत्ता असून संपूर्ण स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे सत्तारूढ पक्षातील पदाधिकारी व नगरसेवकांनी संबंधित लिपीक व मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारून नागरिकांचे काम व्हावे, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.असे असताना त्यांनीसुद्धा दुर्लक्ष केल्याने नागरिकांनी जावे कुठे, असा प्रश्न पडला आहे. चिरीमिरीसाठी लिपीक व मुख्याधिकाऱ्यांनी नागरिकांना त्रास देण्याचा सपाटा सुरू केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. नगर परिषदेतील सावळा गोंधळ केव्हा संपणार, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
फेरफार व नवीन परवानगीचे अनेक प्रकरणे धूळ खात
By admin | Updated: December 29, 2015 20:17 IST