कोठारी : बल्लारपूर तालुक्यातील मानोरा येथे डेंग्यू व मलेरिया या आजाराने थैमान घातले असून नीलिमा गणपत मेडपल्लीवार (१९) या मुलीचा मृत्यू झाला. सध्या गावात २0 ते २५ जणांना मलेरियाने ग्रासले आहे.गावात सर्वत्र अस्वच्छता, गटारे चिखलाने तुडूंब भरून आहेत. गावकर्यांना सातत्याने गढूळ पाण्याचा पुरवठा केला जात आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने मागील अनेक दिवसांपासून गावाच्या स्वच्छतेसाठी कोणतहीही उपाययोजना केली नाही. परिणामी गावात मोठय़ा प्रमाणात डेंग्यू व मलेरियाचा प्रकोप झाला आहे. यात नीलिमा मेडपल्लीवार या मुलीचा चंद्रपूर येथे एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला, गावातील २0 ते २५ जणांना आजाराची बाधा पोहोचली आहे. गावात डेंग्यूची साथ असल्याचे समजताच, गावकर्यांत प्रचंड भीती पसरली आहे. सध्या गावात भीतीचे वातावरण आहे. आरोग्य विभागाने गावात आरोग्य शिबिराद्वारे रुग्णांची तपासणी केली. योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले. गावातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष घालण्याच्या ग्रामपंचायतीला सूचना केल्या आहेत.मानोर्यात डेंग्यू-मलेरिया पसरल्याच्या तक्रारी होताच, आरोग्य विभागाची झोप उडाली. त्यानंतर गावात आरोग्य विषयक सर्व औषधी, आरोग्य कर्मचारी, डॉक्टरांना तत्काळ पाठविण्यात आले. आरोग्य शिबिरात लोकांची तपासणी करण्यात आली. शिबिरात संपूर्ण गावाची तपासणीसाठी झुंबड उडाली. भयभीत झालेले नागरिक आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासनावर खापर फोडू लागले आहेत.मानोरातील नीलिमा मेडपल्लीवार या मुलीचा मृत्यू डेंग्यू किंवा मलेरिया या आजाराने झाला नसून खासगी डॉक्टरांच्या अहवालानुसार तिची किडनी निकामी झाली होती व आतडे खराब झाल्याने तिचा मृत्यू झाला. तिला मलेरिया होता. परंतु मृत्यूचे कारण मलेरिया नसल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी प्रकाश नगराळे यांनी सांगितले. कवडजई, मानोरा, पळसगाव आदी गावात स्वच्छतेचा अभाव असून त्याकडे ग्रामपंचायतीने लक्ष केंद्रीय करावे तसेच पिण्याचे पाण्याकडे योग्य लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.गावात अनेक दिवसांपासून मलेरियाची साथ पसरली आहे. त्याबाबत आरोग्य विभागाला सुचविण्यात आले. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने मुलीचा मृत्यू झाला. आरोग्यविषयक योग्य ती काळजी विभागाने घेतली नसल्याने मलेरियाने गावात उग्ररूप धारण केल्याचे रमेश पिपरे यांनी सांगितले. (वार्ताहर)
मानोरात डेंग्यू, मलेरियाचे थैमान
By admin | Updated: May 7, 2014 14:22 IST