चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याचा विकास हे आपले स्वप्न आणि उद्दिष्ट आहे. त्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू असून त्याचे प्रत्यंतर येत्या पाच वर्षांत दिसणारच आहे. मेक इन चंद्रपूरच्या कामाला सुरूवात झाली आहे, असा विश्वास वित्तमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त बोलताना ते म्हणाले, या जिल्ह्याच्या विकासाकडे आजवर कुणाचेही लक्ष नव्हते. या जिल्ह्याच्या विकासाचा आपणहीे एक भाग व्हावे, असे कुणालाही वाटले नव्हते. म्हणूनच बरीच मोठी साधन सामग्री असूनही आणि विकासाला वाव असूनही या जिल्ह्याकडे आजवर दुर्लक्षच झाले. मात्र आपण ज्या जनतेच्या आशिर्वादाने सत्तेत आलो, त्यांच्यासाठी या जिल्ह्यात विकासाची गंगाजळी वाहविण्याचा ध्यास आपण घेतला आहे. त्यातूनच विविध योजना, प्रकल्पांची आखणी येथे सुरू आहे. अनेक विषय मार्गी लागले असून काही उपक्रम सुरूही झाले आहेत.विकासाची जंत्री सांगताना ते म्हणाले, जिल्ह्यात दारूबंदी करण्याचा शब्द आपण जनतेला दिला होता. सत्तेत येताच तो पूर्ण केला. जिल्ह्याची गरज आणि उपलब्धता लक्षात घेऊन १०० कोटी रूपयांचे बॉटनिकल गार्डन येथे मंजूर झाले आहे. या सोबतच, चंद्रपूर, ब्रह्मपुरी, चिमूर, राजुरा, पोंभूर्णा, मूल या ठिकाणी वन उद्यानही उभारले जाणार आहे. चंद्रपूरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची गरज होती. त्याची पूर्तता आपण करू शकलो याचा आनंद आहे. वन अकादमी, सैनिकी शाळा लवकरच सुरु होत आहे. चंद्रपूरच्या विकासाची गरज लक्षात घेऊन विशेष बाब म्हणून १०० कोटी रूपयांचा निधी प्रथमच चंद्रपूर शहराला देण्यात आपणास यश आले आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यामतून मिशन नवचेतना हा उपक्रम राबविला जात आहे. जिल्ह्यातील २ हजार ५०० अंगणवाड्या आदर्श करण्याच्या दृष्टीने योजना आखली आहे. त्यासाठी यंत्रणा कामी लागली आहे. माजी मालगुजारी तलावासाठी भरीव निधी देऊन शेतकऱ्यांचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न आहे. गोसेखुर्दचे पाणी मिळण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्थेचा घेतलेल्या निर्णयाचा फायदा या जिल्ह्यासाठी चांगला होणार आहे. चंद्रपुरात ७ कोटी ५० लाख रूपये खर्चून नियोजन भवन बांधले जाणार आहे. प्रियदर्शिनी सभागृहाच्या नुतनिकारणासाठी चार कोटी रूपयांचा निधी दिला जाणार आहे. त्यासाठी विकास परिषदा घेवून विकासाचा आराखडा आखलेला आहे. बल्लारपूर पोलीस स्टेशन राज्यात मॉडेल पोलीस स्टेशन म्हणून करण्यासाठी निवडले आहे. बाबूपेठ उड्डाण पुलासाठी गेल्या वर्षभरापासूनच वेगाने प्रयत्न सुरू झाले असून हा प्रश्न मार्गी लागला आहे. चिमूर, बल्लारपूर, चंद्रपूर, मूल, पोंभूर्णा येथील स्टेडियमच्या कामाला गती आली आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ व्हावे यासाठी पाऊले उचलली आहे. वाघांच्या संरक्षणासाठी सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी ब्रँड अँबेसेडर म्हणन जबाबदारी स्विकारली आहे. त्याचाही फायदा या जिल्ह्याला होणार आहे. सिंचनातून समृद्धीसाठी जलयुक्त शिवार ही संकल्पना जिल्ह्यात राबविली जात आहे. वेकोलिसोबत करार करून राज्य सरकार आणि वेकोलि यांच्या माध्यमातून रस्ते बांधकामासाठी प्रत्येकी ५० टक्के खर्चाचा वाटा उचलण्याचा महत्वाकांक्षी निर्णय झाला आहे. वेकोलिच्या मदतीने बाबूपेठ परिसरात एपीजे अब्दूल कलाम यांच्या नावाने एक कोटी रूपये खर्चाचे बालोद्यान विकसित होणार आहे. रोजगार वाढीसाठी चंद्रपूरचे मायक्रो प्लॅनिंग सुरु आहे. त्यातून हजारो तरूणांना रोजगाराची संधी निर्माण करून देण्याचे स्वप्न आहे. बल्लारपूर-आष्टी-आलापल्ली हा राष्ट्रीय महामार्ग अस्तीत्वात आणण्यात यश आले आहे. त्याचा फायदा विकासात होणार आहे. बल्लारपूर, मूल या ठिकाणी चौकांमध्ये कॅमेरे लावण्यात आले आहे. त्यातून गुन्हेगारी रोखणे आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत करणे हा उद्देश आहे.भविष्यात शिक्षण, सिंचन आणि रोजगार यावर भर देणे हे उद्दीष्ट आहे. जिल्हा स्वयंपूर्ण आणि परिपूणर करण्याच्या दृष्टीने या त्रीसुत्रीवर भर देवून योजना आखल्या जाणार आहेत.
मेक इन चंद्रपूरच्या कामाला सुरुवात - सुधीर मुनगंटीवार
By admin | Updated: October 31, 2015 02:02 IST