चंद्रपूर : नगरपालिका, नगरपंचायत व प्रादेशिक योजना क्षेत्रासाठी नुकतीच विकास नियंत्रण नियमावली लागू करण्यात आली आहे. या नियमावलीमुळे छोट्या शहरांच्या विकासाला चालणा मिळणार असून त्या शहरांनाही महानगराचा लूक येणार आहे.यापूर्वी अ वर्ग नगरपालिकांसाठी विकासकामांबाबतची वेगळी व ब आणि क वर्ग नगरपालिकांसाठी वेगळी नियमावली होती. मात्र आता राज्यातील अ, ब, क वर्ग नगरपालिका, नगरपंचायती व प्रादेशिक योजना क्षेत्रासाठी विकास नियंत्रण नियमावली लागू करण्यात आली असून ती सर्व वर्गासाठी सारखीच असणार आहे. त्यामुळे छोट्या शहरांच्या विकासाला प्रोत्साहन मिळणार असून नागरिकांनाही विविध सुविधा मिळणार आहेत. त्याचबरोबर घराच्या किमती नियंत्रणात राहण्यासाठी ही नियमावली महत्त्वाची राहणार आहे. या नियमावलीत सार्वजनिक रस्त्यांसाठी सोडलेल्या जागेचे एफएसआय (चटई क्षेत्र) अन्वये नियोजन करण्यात येणार आहे. जुन्या नियमानुसार चटई क्षेत्र प्रत्येक नगरपालिकांना सारखे लागू नव्हते. त्यामुळे रस्ते लहान केले जात होते. परंतु आता एफएसआय मिळणार असल्याने शहरातील रस्ते मोठे व रुंद होणार आहेत. परिणामी रहदारीमुळे होणाऱ्या कोंडीतून शहरवासियांची मुक्तता होणार आहे. नगरपालिका हद्दीत १५ मीटर उंचीच्या इमारतीला बांधकाम परवानगी देण्यात नवीन नियमावलीची भूमिका महत्त्वाची राहणार आहे.युजर फ्रेन्डली असलेल्या नियमावलीमध्ये एकदा बांधकाम परवानगी घेतल्यानंतर त्याच वर्षात प्रत्यक्ष बांधकामाला सुरूवात करणे बंधनकारक राहणार आहे. नकाशाप्रमाणे बांधकाम झाले नाही तर आर्कीटेक्टवर कारवाईदेखील होणार आहे. विनापरवानगी बांधकाम करणाऱ्यालाही आता कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. नवीन नियमावलीत अनधिकृत बांधकाम नियमित करण्याचीही तरतूद आहे. (शहर प्रतिनिधी)
छोट्या शहरांना येणार महानगराचा ‘लूक’
By admin | Updated: August 18, 2014 23:23 IST