चंद्रपूर शहराला पाणीपुरवठा : दुर्गापुरात तीन ठिकाणी लिकेजदुर्गापूर : दुर्गापूर वॉर्ड क्र. ४ मधील कृषी केंद्राच्या दुकानाजवळ इरई धरणातून चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन तीन ठिकाणाहून लिकेज झाली आहे. या पाईपलाईच्या दुरुस्तीकडे कंत्राटी कंपनीसह महानगर पालिकेचे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याने यातून शेकडो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे.इरई धरणाच्या जलसाठ्यातून वीज केंद्राशिवाय चंद्रपूर शहरालाही पाण्याचा पुरवठा होतो. याकरीता श्वास भूमिगत जलवाहिनी टाकण्यात आली आहे. या जलवाहिनीवर दुर्गापूर वॉर्ड क्र. ४ मध्ये ताडोबा रोड लगत कृषी केंद्राच्या दुकानापुढे एका लगत एक असे तब्बल तीन लिकेज आहेत. यातून २४ तास अतोनात पाण्याचा अपव्यय होत आहे. उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत चालली आहे. यातच लिकेजमधून गेल्या कित्येक महिन्यांपासून दिवसंरात्र पाणी वाया जात आहे. येथे स्थित दुकान मालकांनी ही बाब महानगर पालिकेच्या निदर्शनास आणून दिली आहे. मात्र याची देखभाल दुरुस्ती करणाऱ्या संबंधित कंत्राटी कंपनीने व महानगर पालिका व्यवस्थापनाने अद्यापही या लिकेजची दुरुस्ती केली नाही. सर्वत्र दुष्काळाचे सावट असताना येथे धरणातील पाणी लिकेजमधून वाहून वाया जाते, ही एक वीज केंद्रासह चंद्रपूर शहराला धोक्याची घंटा आहे.सदर लिकेजेसच्या दुरस्त्या होत नसल्याने हे दिवसेंदिवस मोठे होत चालले आहेत. परिणामी पाणीही तीव्र गतीने बाहेर पडत आहे. महानगर पालिका व्यवस्थापन व देखभाल दुरुस्ती करण्याचा कंत्राट असलेल्या संबंधित कंपनीने वेळीच याची दुरुस्ती न केल्यास, हे लिकेज आणखी गंभीर स्वरुप धारण करण्याची दाट शक्यता आहे. (वार्ताहर)
लिकेजमुळे शेकडो लिटर पाण्याचा अपव्यय
By admin | Updated: December 24, 2015 00:56 IST