चंद्रपूर : चंद्रपूर परिमंडळातील २ लाख ६० हजार ग्राहकांकडे तब्बल ६६ कोटी ९० लाखांची वीज देयक थकबाकी असल्याने महावितरणकडून बत्ती गुल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
विदर्भातील महावितरणच्या २२ लाख ग्राहकांकडे ९२३ कोटी रुपयांची थकबाकी आहे. अशा परिस्थितीत महावितरण कंपनी टिकवायची असेल तर वीज बिल वसुलीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे वीज बिल वसुलीत हयगय केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येइल, असा इशारा नागपूर विभागाचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी दिला. पाचही परिमंडळातील मुख्य अभियंते, अधीक्षक, कार्यकारी अभियंत्यांची बैठक ८ सप्टेंबरला नागपुरात बैठक झाली. यावेळी सर्व परिमंडळांचा आढावा घेण्यात आला. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सर्वच वर्गवारीतील थकबाकी १०० टक्के वसूल करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार प्रादेशिक विभागातील कर्मचाऱ्यांनी थकबाकी वसुली व वीज हानी कमी करण्यासाठी नियोजनबद्धरीत्या काम करावे. त्यासाठी मीटर रीडिंग एजन्सीच्या नियमित बैठका घ्यावात. ० आणि १ ते ३० युनिट वीज वापर असणाऱ्या ग्राहकांची काटेकोर तपासणी करावी, तात्पुरता व कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असणाऱ्या ग्राहकांवर लक्ष ठेवून वीज चोरी आढळ्यास कठोर कारवाई करावी, असे निर्देश प्रादेशिक संचालक रंगारी यांनी दिले. सार्वजनिक दिवाबत्ती व पाणी पुरवठा योजनेच्या चालू बिलाची थकबाकी वसुलीचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार कार्यवाही करावी, कोणत्याही प्रवर्गातील ग्राहकांकडे थकबाकी असल्यास ती वसूल करावी, ग्राहक वीज बिलांचा भरणा करत नसेल तर त्याचा वीज पुरवठा खंडित करावे तसेच या कामांत हयगय करणाऱ्या अभियंता, तांत्रिक कर्मचारी व इतरही कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेतही त्यांनी दिले. चंद्रपूर परिमंडळात २ लाख ६० हजार ७२३ ग्राहकांकडे ६६ कोटी ९० लाख थकबाकी आहे. मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने कंपनीला दैनंदिन खर्चही भागविणे अवघड होत आहे. कोरोना काळात असो वा मुसळधार पावसाच्या काळात महावितरणचे सर्व अधिकारी-कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेत ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा देत असतात. हे लक्षात घेऊन ग्राहकांना वीज बिल भरण्याचे आवाहन करावे, असे प्रादेशिक संचालक रंगारी यांनी बैठकीत सांगितले. या बैठकीत नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे, अकोला परिमंडलाचे मुख्य अभियंता अनिल डोये, गोंदिया परिमंडलाचे मुख्य अभियंता बंडू वासनिक, अमरावती परिमंडळाच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण, महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) शरद दाहेदार, नागपूर परिक्षेत्र कार्यालयातील अधीक्षक अभियंते हरीश गजबे, अविनाश सहारे, उपमहाव्यवस्थापक (माहिती व तंत्रज्ञान) प्रमोद खुळे, सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे सर्व परिमंडळाचे सर्व अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते उपस्थित होते.